सिनियर डॉक्टरांच्या मनमानीला चाप! ओपीडी सकाळी ८ वाजता सुरू करणे अनिवार्य, बायोमेट्रिक हजेरी; अन्यथा पगार कट!

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोफत व योग्य उपचार होतो म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने रुग्ण धाव घेतात.
सिनियर डॉक्टरांच्या मनमानीला चाप! ओपीडी सकाळी ८ वाजता सुरू करणे अनिवार्य, बायोमेट्रिक हजेरी; अन्यथा पगार कट!
PM
Published on

मुंबई : ओपीडी सुरू झाल्यानंतरही ओपीडीत उपस्थित न राहणाऱ्या सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता आणि संध्याकाळी घरी जाण्याआधी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असून तसे न केल्यास संबंधिताचा पगार कापण्यात येईल, असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांना दिला आहे. शिंदे यांच्या या निर्णयामुळे प्राध्यापक, सिनियर डॉक्टरांच्या मनमानीला चाप बसणार आहे. तसेच यापुढे प्रत्येक रुग्णालयातील ओपीडी सकाळी ८ वाजता सुरू करणे अनिवार्य असणार आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोफत व योग्य उपचार होतो म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने रुग्ण धाव घेतात. वर्षाला २० लाखांहून अधिक रुग्ण पालिका रुग्णालयात उपचार घेतात. मात्र रुग्णालयात आल्यावर केस पेपर काढणे, डॉक्टरांची प्रतीक्षा करणे यात रुग्णांचा अर्धा दिवस निघून जातो. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आधी सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांना शिस्त लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सकाळी ८ वाजता ओपीडी सुरू करणे आणि सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांना दररोज बायोमेट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टरांची बायोमेट्रिक हजेरीची लिंक डॉक्टरांच्या पगाराशी जोडण्यात आली. एखाद्या डॉक्टरने बायोमेट्रिक हजेरी लावली नसल्यास संबंधित सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांचा पगार कट करण्यात येईल, असा इशारा परिपत्रकातून दिला आहे. पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात याची कटाक्षाने अंमलबजावणी करणे, त्या-त्या रुग्णालयातील अधिष्ठाता यांची जबाबदारी असेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

 स्वागतार्ह निर्णय

नॅशनल मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार, प्रत्येकाला हजेरी लावणे गरजेचे आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने आता सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली, हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितिन डांगे म्हणाले.

 सरप्राइज व्हिजिटनंतर रुग्णालयात स्वच्छता

अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी रात्री मध्यरात्री अचानक पालिका रुग्णालयात सरप्राइज व्हिजिट करण्यास सुरुवात केली. तसेच शिंदे यांनी पालिका रुग्णालयातील स्वच्छतेवर भर दिला. शिंदे यांच्या सरप्राइज व्हिजिटनंतर पालिका रुग्णालयात स्वच्छतेचे नियम पाळले जात असून आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in