वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांना फटका!

महिन्याभरात ६ पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू
वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांना फटका!
Published on

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आपल्या भावना व्यक्त न करता येणाऱ्या मुक्या प्राणी आणि पक्ष्यांना वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठाणे, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या सर्व शहरात तापमानात चढउतार होत असल्याने पक्ष्यांच्या आरोग्याबाबत सर्वाधिक तक्रारी जाणवू लागल्या आहेत. तीव्र उष्णतेमुळे पक्ष्यांना वारेफोड्यासारखा आजार होत असून यामुळे पक्षी आकाशात विहार करीत असतानाच जमिनीवर कोसळण्याचे प्रमाण वाढल्याचे ठाणे जिल्ह्यातील वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनचे प्रमुख आदित्य पाटील यांनी सांगितले. मागील महिन्याभरात ६ पक्ष्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे, तर १२ हून अधिक पक्षी-प्राण्यांवर उपचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

वाढत्या उष्णतेमुळे धडधाकट आणि चालत्या-बोलत्या नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत असताना दुसऱ्या बाजूला आपले दुखणे न सांगू शकणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना याच्या सर्वाधिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यात पक्ष्यांना अशक्य झाल्याने उष्माघाताने महिन्याभरात जवळपास ६ पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर १२ हून अधिक पक्षी-प्राणी आजतागायत पशुवैद्यकीय केंद्रात उपचार घेत आहेत.

दरम्यान, उष्माघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण कबुतरांचे असून, गेल्या १० दिवसांत ३ कबुतर मरण पावले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या इतर पक्ष्यांमध्ये कावळे (१), चिमण्या (१), साळुंकी (१) आदींचा समावेश आहे, तर उष्माघाताने जमिनीवर अचानक पडल्याने जखमी झालेले आणि पंखाखाली पुरळ उठून हवेत तरंगण्यास असमर्थ ठरलेले विविध प्राणी व पक्षी प्रथमोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. उन्हाची वाढलेली तीव्रता आणि पाण्याची उपलब्धता घटल्याने पक्ष्यांचे असे अपघात वाढले आहेत.

उन्हाळा वाढल्याने पक्ष्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. लोकांनी घराच्या गॅलरीत, गच्चीत किंवा इमारतीच्या भिंतीवर मीठ, साखर घातलेले पाणी एका भांड्यामध्ये ठेवले पाहिजे. हे पाणी त्यांना ताकद देण्यासाठी उपयोगी ठरेल.

- शिवाजी तळेकर, पशुवैद्य

logo
marathi.freepressjournal.in