जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार; नागरी नोंदणी प्रणाली अद्ययावत होणार

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म -मृत्यू नोंदणीसाठी केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची प्रक्रिया भारताचे महाप्रबंधक, जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे.
जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार; नागरी नोंदणी प्रणाली अद्ययावत होणार
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म -मृत्यू नोंदणीसाठी केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची प्रक्रिया भारताचे महाप्रबंधक, जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरू आहे. लवकरच नागरी नोंदणी प्रणाली सुधारित व अद्ययावत कार्यान्वित होणार आहे. यामुळे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तसेच सहज, सुलभपणे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकतील. ही प्रणाली पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीतील जन्म-मृत्यू नोंदणीकरिता, महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाने १ जानेवारी २०१६ पासून नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. भारताचे महाप्रबंधक व जनगणना आयुक्त कार्यालयाकडून नागरी नोंदणी प्रणालीमध्ये २४ जून २०२४ पासून सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांना सहज, व वेगाने प्रमाणपत्र देता यावेत, यासाठी अद्ययावत केली जात आहे.

या नवीन सुधारणांसाठी सद्यस्थितीत होत असलेल्या तांत्रिक कामकाजामुळे या प्रणालीतून जन्म -मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करतांना नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) मध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त होत होती. सद्यस्थितीत सुधारित नागरी नोंदणी प्रणालीविषयक अद्ययावतीकरण सुरू असल्याने नागरी सुविधा केंद्रामध्ये देखील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना मिळत नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ई-मेलवर मिळणार प्रमाणपत्र

२४ जून २०२४ नंतर जन्म-मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करताना, नागरिकांनी त्यांचा अचूक ई-मेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास महानगरपालिका विभाग कार्यालयांमधील (वॉर्ड) वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in