'५० खोके, एकदम ओके', भाजपच्या घोषणा; एकनाथ शिंदेंच्या सेनेला डिवचले

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते.
'५० खोके, एकदम ओके', भाजपच्या घोषणा; एकनाथ शिंदेंच्या सेनेला डिवचले
Published on

मुंबई : मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते.

मात्र, आपल्या मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याचे दिसून आले. या सगळ्या प्रकरणावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असे शिंदे म्हणाले. तर अशा घोषणा देण्याआधी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा, अशा घोषणा देणारे आज कुठे गेले ते एकदा तपासा, असा टोला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर अशी मैत्रिपूर्ण लढत होत आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांचा प्रभागात प्रचार सुरू होता.

प्रचारादरम्यान भाजप शिवसेनेचे कार्यकर्त्यांसमोर कार्यकर्ते आल्यावर '५० खोके एकदम ओके'च्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी देण्यास सुरूवात केली.

logo
marathi.freepressjournal.in