मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला आढावा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी भाजप नेत्यांसमोर ठेवले आहे.
मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी घेतला आढावा

प्रतिनिधी/मुंबई

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लोकसभेच्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी भाजप नेत्यांसमोर ठेवले आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली. त्यावेळी नड्डा यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका. जनतेत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवा. नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा, असे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

भाजपाने लोकसभा निवडणुकीत चारसौ पारचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ भाजपाच्या द़ष्टीने महत्वाचे आहेत. महायुतीच्या माध्यमातून या सहाच्या सहा जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. जे.पी.नड्डा यांनी मुंबई दौ-यात या मतदारसंघांचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संपर्क, मीडिया व्यवस्थापन, वाहन व्यवस्था, महत्वाच्या नेत्यांच्या सभेचे आयोजन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर व समाजातील प्रमुख व्यक्तींचा सहभाग याबद्दल जे.पी.नड्डा यांनी मार्गदर्शन केले.

मोदी सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांच्या चुका देखील लक्षात आणून द्या. नेत्यांनी महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नये. जनतेत राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवा, नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा, असे निर्देश नड्डा यांनी यावेळी दिले.

मुंबईत भाजपाची ताकद होतीच

मुंबईत भाजपाची ताकद होतीच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आल्याने त्यात वाढच झाली आहे. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्या मनसेलाही सोबत घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. उदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद मुंबईत अजूनही आहे. लोकसभेच्या नंतर होणाऱ्या विधानसभा तसेच मुंबई महापालिका निवडणूका या भाजपा तसेच एकूणच महायुतीसाठी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे भाजपाचे मुंबईवर विशेष लक्ष आहे. जे.पी.नड्डा यांचा मुंबई दौरा हा त्यामुळेच आयोजित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in