
मुंबई : मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची महत्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही. यासाठी भाजपचे विभागस्तरावर प्रयत्न सुरू असून मुंबई महापालिकेवर आता कमळ फुलवण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. या दरम्यान सहपालकमंत्री संपूर्ण मुंबईचा आढावा घेऊन नागरिकांशी संवाद साधून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचे समजते आहे.
मुंबईत १९७०च्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. मात्र, शिवसेनेच्या संख्याबळात घट होत राहिली. पालिकेत शिवसेना-भाजप युती अनेक वर्षांपासून राहिली असली तरी भाजपच शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी ठरला आहे. पालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष २०१७मध्ये स्वतंत्र लढले. त्यात शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागा जिंकल्या. २०१२च्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीडपट भर पडली. तेव्हापासूनच भाजप मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिला आहे. गेल्या काही वर्षांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मुंबईतील मतांची टक्केवारी सातत्याने वाढत राहिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली. मात्र, त्याच्याही आधीपासून भाजपने मुंबई महापालिकेत दीडशे जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीतील अद्भुत यशानंतर भाजपचे मुंबईतील नेते महापालिकेत २००पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करू लागले आहेत. यासाठी भाजपचे नेते सर्वच स्तरावरून जनमानसात टिकून राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच, ज्या विभागात भाजपला मागच्या निवडणुकीत फटका बसला होता, त्या विभागात सहपालक मंत्र्यांसह कार्यकर्ते विशेष लक्ष देणार असल्याचे समजते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्या तरी सर्वपक्षीय नेत्यांची लक्ष मुंबई पालिकेवर आहे. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि भाजप मध्ये चढाओढ सुरु आहे.
शिवसेनेतील फुटीचा भाजपला फायदा
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यापासून ठाकरेंचे निम्म्याहून अधिक आजीमाजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईतील मत विभागणीची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, याचाच फायदा भाजपला होणार आहे, ज्याठिकाणी ठाकरेंची शिवसेना कमकुवत ठरेल त्याठिकाणी भाजपचा विजय नक्की होईल, असा विश्वास एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला.
निवडणुकीसाठी भाजपचे नेते झाले सक्रीय
जेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत तेव्हापासून भाजपचे आजी माजी नगरसेवक, आमदार, खासदार तसेच कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. पालिकेत कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्त येऊन इथल्या अधिकाऱ्यांशी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधून प्रभागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.