
मुंबई : हिंदी भाषा सक्ती लादणाऱ्या भाजपला मराठी माणसाची वज्रमूठ भारी पडली. मराठी माणूस एकत्र आला आणि त्याने तीव्र विरोध केल्यानंतर शासन निर्णय रद्द करण्याची वेळ भाजपवर आली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली आहे. ही आग सर्वांपुढे दाखवताही येत नाही आणि शमवताही येत नाही. मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना ‘रुदाली’ वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस व्यक्तीची माणसे आहेत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्यावर सडकून टीका केली.
सोमवारी विधिमंडळात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधूंवर टीका करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासह राज्यातील सर्वच भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरे यांनी यथेच्छ समाचार घेतला. ते म्हणाले की, “हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर शनिवारी एनएससीआय डोममध्ये विजयोत्सव साजरा झाल्यामुळे भाजपच्या बुडाखाली आग लागली आहे. मराठीचा खरा मारेकरी भाजपच आहे. आम्ही एकत्र आल्यामुळे या लोकांच्या बुडाला आग लागणे स्वाभाविकच आहे. भाजपचे राजकारणच ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ या नीतीवर अवलंबून आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या, हाच भाजपचा धंदा आहे. हा धंदा आता संपला आहे. त्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागल्याचे मी समजू शकतो. भाजप खासदार निशिकांत दुबेसारखे लकडबग्गे आहेत, ‘जो आग लगाने की, कोशिश कर रहै है!”
‘पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या अन् राज्यात निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतात,’ अशी टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राज ठाकरेंवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मराठी माणसांची तुलना अतिरेक्यांशी करणारे लोक मराठी व महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. या मारेकऱ्यांना मराठी लोकांनी आता ओळखले पाहिजे. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का? हे त्यांनी सांगावे. ते सापडत का नाहीत? जे लोक आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांच्या घरात हे अतिरेकी राहत आहेत का? हे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत, याची लाज वाटते.”
राज्यातील सर्व माध्यमांनी वरळीतील मेळाव्यासाठी सहकार्य केले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सर्वंच माध्यमांचे आभार मानले. “मुंबईत मराठी माणसासह इतर भाषिकही गुण्या-गोविंदाने राहत आहेत. मराठीचा वाद पेटवत मराठी माणसात वाद लावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र हिंदी सक्तीला मराठी माणसाने तीव्र विरोध केला आणि शासनाला हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला, त्यास मराठी माणसाची एकजूट कारणीभूत ठरली आहे.”
मूळ भाजप हा पक्ष आता मेलेला आहे
फडणवीस यांच्या ‘रुदाली’ टीकेवरून उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण, मूळ भाजप हा पक्ष आता मेलेला आहे. उर बडवण्यासाठी त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले उरबडवे घेतलेत. त्यांनी देशभरातही इतर पक्षांतील उरबडवे घेतलेत. शिवसेनेसोबत युती करणारा मूळ भाजप या लोकांनी मारून टाकला. आता उर बडवायला त्यांची ओरिजनल माणसे नाहीत. त्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ते अत्यंत विकृत व हिणकस व्यक्तीची माणसे आहेत.”
युतीबद्दल बोलू नका, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीबद्दल बोलू नका, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी माझी परवानगी घ्यावी, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसते.