भाजप-बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार - दीपक केसरकर

कम्युनिस्टांचा शिवसेनेला पाठिंबा म्हणजे वैचारिक भूमिकांचा कडेलोटच असल्याचेही ते म्हणाले.
भाजप-बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढणार - दीपक केसरकर

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची, हे आमच्या युतीच्या बैठकीत ठरेल. त्यानुसार शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल; मात्र युती म्हणूनच आम्ही निवडणूक लढविणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. समोरच्यांना केवळ सहानुभूती मिळविणे आणि त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणे इतकेच जमते, असा टोलाही त्यांनी लगावला. कम्युनिस्टांचा शिवसेनेला पाठिंबा म्हणजे वैचारिक भूमिकांचा कडेलोटच असल्याचेही ते म्हणाले.

ऋतुजा लटके यांना आम्ही कधीही ऑफर दिलेली नसल्याचे स्पष्ट करताना दीपक केसरकर म्हणाले, ‘‘त्यांनी जो राजीनामा आधी दिला होता, तो लिहिताना नियम माहिती नव्हते का. शिवसेनेचे बहुतांश नेते हे मुंबई महापालिकेच्या मुशीतच तयार झालेले आहेत. त्यांनाही हे नियम माहिती नव्हते का. मग चूक झाली की सरळ खापर आमच्या डोक्यावर फोडायचे, हे योग्य नाही. आमचा त्यात काहीच सहभाग नाही. हा केवळ सहानुभूती मिळविणे आणि त्यातून मतांची बेगमी करता येते का, याचा प्रयत्न करणे हाच प्रकार आहे. निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती; मात्र त्यासाठी समोरच्या बाजूने थोडा तरी विनम्रपणा दाखविला गेला पाहिजे होता. सगळ्यांनी एकत्र बसून आधीच चर्चा केली असती तर चित्र वेगळेही दिसू शकले असते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना शासकीय निवासस्थान देण्यात मुद्दामहून दिरंगाई करण्यात आलेली नाही. मी देखील मंत्री झालो तेव्हा मला देखील महिनाभर बंगला मिळण्यासाठी थांबावे लागले होते, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in