
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. महापालिका काबीज करण्यासाठी मुंबईवर फोकस केला असून वॉर्ड निहाय आढावा घेत ७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष व मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली.
वॉर्डनिहाय आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्ह्याची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमित साटम आणि आमदार विद्या ठाकूर घेणार आहेत.
उत्तर पूर्व जिल्ह्याचा आढावा आ. मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी आमदार पराग अळवणी आणि आमदार संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा आ. प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनील राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकूण २७ सदस्यांच्या समितीमध्ये आजी माजी आमदार, माजी नगरसेवक, महिला युवा मोर्चा अध्यक्षांची -नियुक्ती करण्यात आली आहे.