राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे - भाई जगताप

सोनिया गांधी यांना मोदी सरकारच्या ईडीने खोट्या प्रकरणात चौकशीसाठी बोलाविले आहे
 राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे - भाई जगताप
Published on

महागाई, बेरोजगारी देशात वाढत आहे, देशातील स्वायत्त संस्था नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने विकायला काढलेल्या आहेत. भाजपने सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक जीएसटी लादला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या याच दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहेत. हे आपले पाप, आपले अपयश लपविण्यासाठी फक्त राजकीय द्वेषातून केंद्रातील भाजप सरकार सोनिया गांधींवर ईडीमार्फत कारवाई करत आहे, याचा काँग्रेसतर्फे देशभरात निषेध करत आहोत, असा घणाणाती आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी मुंबईत केला.

केंद्र सरकारच्या दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात सातत्यपूर्ण आवाज उठविणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मोदी सरकारच्या ईडीने खोट्या प्रकरणात चौकशीसाठी बोलाविले आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात काँग्रेसतर्फे आंदोलन सुरु आहे. मुंबईत मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ईडी कार्यालयावर गुरुवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चामध्ये भाई जगताप आणि नाना पटोले यांच्या समवेत चरणसिंग सप्रा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार संजय निरुपम व हुसैन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अस्लम शेख, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आशिष दुआ, मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार झिशान सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागुल, मुंबई काँग्रेसचे सर्व आजी-माजी आमदार, खासदार व नगरसेवक, मुंबई काँग्रेसचे सर्व जिल्हाध्यक्ष मुंबई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चादरम्यान काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील मनमानी व जनविरोधी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

logo
marathi.freepressjournal.in