
खारघरमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉक्टर श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांचा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र, यावेळी उष्माघातामुळे तब्बल १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत ढिसाळ नियोजनामुळे हा अपघात घडल्याचे आरोप केले. तसेच, हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत गेले आहे. या सर्व प्रकरणावर आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सुरु असलेल्या टिकेवरून विरोधकांचा समाचार घेतला तर घडलेल्या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची पूर्वनियोजत वेळ संध्याकाळचीच ठेवली होती. पण, कार्यक्रमाला श्री सदस्य मोठ्या प्रमाणात येणार असल्याने आणि त्यांच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शक्ती, यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा कार्यक्रम रात्री ठेवू नका, अशी विनंती केली होती. ती विनंती मान्य करून कार्यक्रम दुपारी घेण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळी केला असता तर पुन्हा रात्री घरी परतताना श्री सदस्यांची अडचण झाली असती," असा खुलासा त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, "न्यायालयात याचिका करून या प्रकरणावर राजकारण केले जात आहे. कार्यक्रमाचे नियोजन हे बारकाईने करण्यात आले होते. २० ते २५ लाख श्री सदस्यांसाठी मंडप घालणे अशक्य होते. तसेच, उष्णता एवढी वाढेल याची कल्पना नव्हती. उष्माघात हा नैसर्गिक होता. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा होऊ शकते, पण अनेक राजकीय पक्षांनी केवळ राजकारण करण्यातच धन्यता मानली." असा आरोप त्यांनी केला आहे.