भाजप कधीच मित्रपक्षाला धोका देत नाही - देवेंद्र फडणवीस

बिहारमधील भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते सुशीलकुमार मोदी यांच्या विधानावर त्‍यांनी प्रतिक्रिया दिली होती
भाजप कधीच मित्रपक्षाला धोका देत नाही - देवेंद्र फडणवीस

“भाजप कधीच मित्रपक्षाला धोका देत नाही. बिहारमध्ये आमचे जास्‍त आमदार असताना आम्‍ही जदयूला मुख्यमंत्रिपद दिले होते. महाराष्‍ट्रातदेखील आता आम्‍ही तेच केले आहे. शरद पवार यांचे दुःख जरा वेगळे आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

भाजप नेहमी मित्रपक्षाला संपवत असतो, असे विधान राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. बिहारमधील भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते सुशीलकुमार मोदी यांच्या विधानावर त्‍यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्‍यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा आक्षेप फेटाळून लावला. “बिहारमध्ये आमचे ७५ आमदार निवडून आले होते. जदयूचे ४२ आमदार येऊनही आम्ही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. महाराष्‍ट्रात त्‍यावेळी शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्‍हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली आहे. शिवसेनेचे ५० आमदार आहेत, आमचे ११५ असतानाही त्‍यांना मुख्यमंत्रिपद दिले. मंत्रिमंडळ विस्‍तारातही आमचे नऊ आणि त्‍यांचे नऊ असा शपथविधी झाला. भाजप कधीच मित्रपक्षाला धोका देत नाही. पवारसाहेबांचे दुःख जरा वेगळे आहे. ते आपल्‍याला माहिती आहे,” असे फडणवीस म्‍हणाले.

मीडियाचे खातेवाटप सपशेल चुकीचे ठरेल

“मंत्रिमंडळ विस्‍तारानंतर प्रसारमाध्यमांमध्ये संभाव्य खातेवाटप छापून आले आहे. त्‍याबाबत विचारले असता प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्‍या खातेवाटपाबाबतच्या बातम्‍यांमध्ये तथ्‍य नाही. मीडियाचे खातेवाटप सपशेल चुकीचे ठरेल,” असेही फडणवीस म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in