

मुंबई : आयपीएल सामन्यांदरम्यान स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या ‘सलाम मुंबई’ या घोषणेवर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईची संस्कृती आणि ओळख ‘सलाम मुंबई’ नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी सुसंगत ‘नमस्कार मुंबई’ अथवा ‘नमस्ते मुंबई’ अशी असली पाहिजे. त्यामुळे ‘सलाम मुंबई’ हा शब्दप्रयोग तत्काळ बंद करून त्याऐवजी ‘नमस्कार मुंबई’ किंवा ‘नमस्ते मुंबई’ या शब्दांचा वापर करण्यात यावा, असे पत्र भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना पत्र लिहून केली आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या मते ‘सलाम’ या शब्दाऐवजी ‘नमस्कार’ किंवा ‘नमस्ते’ हे शब्द महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भावनांचे प्रतिनिधीत्व करतात, असे सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.
भविष्यात आयपीएल किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यांदरम्यान 'सलाम मुंबई'सारख्या घोषणा प्रसारित करू नयेत आणि त्याऐवजी ‘नमस्कार मुंबई’ अथवा ‘नमस्ते मुंबई’ यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोठ्या स्क्रीनवर ‘जय महाराष्ट्र’सारखे संदेश प्रसारित करा!
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे आणि भविष्यात आयपीएल किंवा इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यात ‘सलाम मुंबई’सारख्या घोषणांचे प्रसारण पूर्णतः बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच मोठ्या स्क्रीनवर ‘जय महाराष्ट्र’सारखे संदेश प्रदर्शित केल्यास महाराष्ट्राच्या अस्मिता आणि जनभावनांचा अधिक योग्य सन्मान होईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.