मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी ; जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा

भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बुधवारी मुंबईत दीड दिवसाचा दौरा आयोजित केला
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी ; जे. पी. नड्डा यांचा मुंबई दौरा

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीची तयारी आणि वातावरण निर्मितीचा भाग म्हणून मुंबई भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा बुधवारी मुंबईत दीड दिवसाचा दौरा आयोजित केला आहे. मुंबईचा दौरा करून नड्डा गुरुवारी पुण्यात आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमांची आखणी केली आहे. पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचे मुंबईत दौरे आयोजित करून भाजपने मुंबईकरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यानुसार नड्डा हे दोन दिवस मुंबई, पुण्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई भाजप कोअर समितीच्या नेत्यांशी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत नड्डा हे पुण्यात राज्यातील खासदार-आमदार तसेच राज्य मंत्रिमंडळातील तसेच राज्यातील केंद्रीय मंत्री यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नड्डा यांच्या दौऱ्याची माहिती दिली. त्यानुसार नड्डा यांचे बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. यावेळी त्यांचे स्वागत केले जाईल. सायन-पनवेल मार्गावर देवनार येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नड्डा यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर आरबीके हॉल येथे केंद्रीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद, रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नड्डा हे रमाबाई नगरमध्ये पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी दुपारचे भोजन घेतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.

याशिवाय बोरिवली येथील अटल स्मृती उद्यानात विविध क्षेत्रातील बुध्दिवंतांशी संवाद, चारकोप येथे पन्ना प्रमुख बैठकीत सहभाग, मुंबईतील पक्षाच्या मोर्चा, आघाडी प्रमुखांशी संवाद असे विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार आहेत. रात्री नड्डा यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर असेल. येथे नड्डा हे मुंबई भाजपच्या कोअर समितीची बैठक घेतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मे रोजी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद, युवक संवाद या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. या दरम्यान ते सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत. तसेच दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनालाही भेट देणार आहेत.

मुंबईतून पुण्याला जाण्यापूर्वी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. गुरुवारी पुण्यात भाजपची प्रदेश कार्यसमितीची बैठक होत आहे. प्रदेश कार्यकारिणीचे सुमारे दीड हजार सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा समारोप जे. पी. नड्डा यांच्या भाषणाने होणार आहे. या बैठकीनंतर नड्डा हे राज्यातील खासदार, आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते राज्यातील केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in