

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत माजी नगरसेवक येण्याचा ओघ सुरू असून आतापर्यंत १३० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरात शिंदेंची ताकद दिवसेंदिवस वाढत असून भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. दुसरीकडे मनसे व ठाकरे सेनेची युती झाली असून मनसे, ठाकरे सेना व शिंदे सेनेच्या मुंबईतील निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडा कमी करण्यासाठी भाजपने बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी खेळल्याचे भाजपच्याच गोटातून सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईत तसे वर्चस्व नाही. मात्र २०२२ पासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरेंची सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळेपासून शिंदेंच्या सेनेत जोरदार इन कमिंग सुरू असून मुंबईतील जागा राखणारे माजी नगरसेवक शिंदे सेनेत सामील झाले आहेत. यामुळे शिंदे यांची मुंबईत ताकद वाढली असून महायुतीत शिंदे सेना नंबर दोनचा पक्ष आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बारगेनिंग पावर वाढली असून भाजपला शिंदे सेना डोईजड होऊ शकते, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हेरले आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांविरोधात भाजपने बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवण्याची खेळी खेळल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
पाडापाडीची चाचपणी
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप १५० जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे समजते, तर शिंदेंच्या सेनेला ६० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने शिंदेंना दिला आहे. मात्र, एकनाथ शिंदे १०० जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. एकनाथ शिंदे यांची वाढती बारगेनिंग पावर लक्षात घेता भाजपने शिंदे सेनेविरोधातच रणनीती आखली असून बंडखोर उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू केली आहे.
पारंपरिक मतदारांवरही लक्ष
उत्तर भारतीय, गुजराती, तेलुगू, कन्नड असे विविध समाजाचे लोक भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्यावरही लक्ष दिले असून त्यांच्या माध्यमातून भाजपचा ११० जागांवर विजय मिळेल, असा विश्वास भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला.