पालिकेत भाजपने कार्यालय थाटले! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप बेस्टचे १२३ कंत्राटी कामगार लवकरच कायम सेवेत

बेस्टच्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या, या मागणीसाठी दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्तांची भेट घेतली.
पालिकेत भाजपने कार्यालय थाटले! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप बेस्टचे १२३ कंत्राटी कामगार लवकरच कायम सेवेत

मुंबई : मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असून सध्या पालिकेचा कारभार भाजप हाकत आहे. पालकमंत्र्यांना मुख्यालयात दालन उपलब्ध केले म्हणजे भाजपने कार्यालय थाटले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान, बेस्ट उपक्रमात गेली १७ वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या १२३ कामगारांना लवकरच बेस्टच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असून याबाबत आयुक्त लवकरच ऑर्डर काढणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.

बेस्टच्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घ्या, या मागणीसाठी दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि मुंबई महापालिकेत प्रशासकीय राज्य आहे. मुंबई महापालिका ही स्वायत्त संस्था असली तरी सध्या पालिकेचा कारभार भाजप हाकत आहे. त्यामुळे निधी वाटपात दुजाभाव करण्यात आला. निधी वाटपात भाजपला झुकते माप देत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात निधी दिलेला नाही. याविषयी पालकमंत्र्यांची भेट घेणार असून योग्य निर्णय न झाल्यास पालिकेच्या वॉर्ड स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, कामगार नेते सुहास सामंत, माजी नगरसेवक सचिन पडवळ व ठाकरे पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी पालकमंत्र्यांच्या दालनाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या नावाखाली भाजपने मुंबई महापालिका मुख्यालयात आपले कार्यालय थाटले आहे. पालकमंत्र्यांना पालिका मुख्यालयात दालन मिळत असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून आपल्यालाही दालन मिळावे, यासाठी आपण आग्रही आहोत. परंतु आयुक्तांच्या भेटीत हा मुद्दा उपस्थित केला नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, दानवे यांनी केलेल्या आरोपावर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in