मनसे - भाजप बैठकी वाढल्या ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप उलघडलेले नाही
मनसे - भाजप बैठकी वाढल्या ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट
ANI

मनसे आणि भाजप यांच्यात युती होण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. युतीचे संकेत देण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही वाढत आहेत. नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नवीन शिवतीर्थ बंगल्यावर ही बैठक झाली. काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप उलघडलेले नाही. मात्र या भेटीला सध्याच्या घडीला राजकीय महत्त्व असल्याचे बोलले जात आहे.

चंद्रशेखर बावन्नकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी राज ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अजून पुढे आलेले नाही. उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर प्रथमच गणपती बसवण्यात येणार आहे. या भेटीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या गणेशाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी, मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती लक्षात घेता अमित शहा यांचा ५ सप्टेंबरला होणारा मुंबई दौरा, मनसे-भाजपमधील ही जवळीक बरेच काही सांगून जात आहे. मनसेकडे असलेली मराठी व्होटबँक काबीज करण्यासाठी भाजप मनसेशी जवळीक साधत असल्याचेही बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in