भाजप आजही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत, शिंदेना आम्ही बंडखोर मानत - सुधीर मुनगंटीवार

विश्वासदर्शक ठरावाची मागणी करायची आज तरी गरज असल्याचे वाटत नसल्याचेही ते म्हणाले
 भाजप आजही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत, शिंदेना आम्ही बंडखोर मानत - सुधीर मुनगंटीवार

“एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे आमदार बंडखोर असल्याचे आम्ही मानत नाही. ते शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून अद्याप तरी भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भाजप आजही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील, त्यांच्यावर आमची नजर असेल. कोअर कमिटीच्या बैठकीत त्या संदर्भात वेळोवेळी उचित निर्णय घेण्यात येईल,” असे भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विश्वासदर्शक ठरावाची मागणी करायची आज तरी गरज असल्याचे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील राजकीय घडामोडींबाबत गेले काही दिवस भाजपने कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. हा शिवसेना तसेच आघाडीतील अंतर्गत प्रश्न असल्याचेच भाजपनेते उघडपणे बोलत होते; मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजप सक्रिय झाली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पार पडली. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्यासह इतर प्रमुख नेते तसेच आमदार उपस्थित होते. राज्यातील राजकीय रिस्थितीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवसेनेतील दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. “आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बंडखोर मानतच नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचारच ते पुढे घेऊन चालले आहेत. ते २४ कॅरेट खरे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आम्हाला अद्याप तरी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पुढच्या दिवसांत कोणते प्रस्ताव आले तर आम्ही त्यावर विचार करू. भाजप सध्या तरी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे,” असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in