
भाजपला शिवसेना संपवायचीय. शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. म्हणून त्यांना हाताशी धरून हा घाट घातला गेला आहे; पण हे सोपे नाही. जे फुटले आहेत, त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावेच लागेल. जे बाहेर पडलेत त्यांच्यात जर खरंच मर्दुमकी असेल तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता स्वतःच्या नावावर मते मागावीत, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर, अजय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. म्हणाले, ‘‘भाजपला शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. मुंबईवरचा भगवा शिक्का पुसून स्वतःचा शिक्का उमटवायचा आहे; पण ते सोपे नाही. कारण आता हळूहळू सर्व चित्र स्पष्ट होते आहे. जे गेलेत त्यांच्यासोबत कोणी नाही, कारण त्यांना असामान्य बनविणारा शिवसैनिक आज आमच्यासोबतच आहे. आता पुन्हा सामान्यांतून असामान्य बनवायचे आहे. २७ तारखेला माझा वाढदिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका, तर शपथपत्र आणि सदस्य नोंदणीचे गठ्ठे घेऊन,’’ या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
‘‘जे गेलेत ते बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो न वापरता स्वतःच्या नावाने लोकांमध्ये जावे. स्वतःच्या आई-वडिलांना सोबत घेऊन जावे. आता जे त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केले; तेच तर मी अडीच वर्षांपुर्वी सांगत होतो. तेव्हा झाले असते तर सगळे सन्मानाने झाले असते; मात्र जागा, सत्ता सर्व समप्रमाणात वाटप ठरले असताना त्यांनी अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शब्द फिरविला. तेव्हाच हे केले असते तर अडीच वर्षांसाठी भाजपच्या कोणाला तरी सत्तेचा शेंदूर बसला असता असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘‘समोरच्यांनी प्रोफेशनल एजन्सी नेमल्या आहेत. त्यांचा पैसा तर आपली निष्ठा अशी लढाई आहे. आदित्य महाराष्ट्रात फिरतोच आहे. मी देखील आता उतरणार आहे. लवकरच गणपतीबाप्पाचे आगमन होते आहे. गणपतीबाप्पा हे अरिष्ट लवकरच तोडून मोडून फेकून देईल आणि शिवसेनेचा भगवा केवळ महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर फडकेल,’’ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
गद्दार त्यांच्या कपाळावरच लिहिलंय
बंडखोरांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कितीही वादळे आली तरी शिवसेनेची मूळे घट्ट आहेत. जे सोडून गेले, त्यांचे कोणत्या भाषेत वर्णन करायचे. संपूर्ण जगच त्यांना आता गद्दार म्हणतय. आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी विनंती त्यांनी केलीये. मात्र, आपल्या कपाळावर त्यांनीच स्वत:च्या हाताने हा शिक्का मारून घेतला आहे. बंडखोरांसोबत एकही सच्चा शिवसैनिक नाही. त्यांना वाटले जेथे सत्ता असेल तेथे शिवसैनिक जाईल. मात्र, जेथे शिवसैनिक असतो तेथे सत्ता जाते, हे त्यांना अद्याप माहिती नाही,’’ असा टोला त्यांनी लगावला.
दिल्लीला झुकवणार
दिल्लीला झुकवणारे शिवरायांचे रक्त अजून भाजपला कळले नाही, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘आपण कुणाशी पंगा घेतलाय हे अजून त्यांना कळलेले नाही. शिवसेनेसोबत सामान्य माणूस आहे आणि या सामान्य माणसांत असामान्य ताकद असते. भाजपला आता मुंबईवर ठसा उमटवायचा आहे. मात्र, शिवसेनेवर ज्या-ज्या वेळी संकटं आली, तेव्हा-तेव्हा शिवसेना अधिक जोमाने उभी राहिली आहे.’’