आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

येत्या अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन केले जाते
आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी वसाहत येथील तीनही तलावांत यंदा गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे; मात्र कृत्रिम तलाव उभारण्यासाठी परवानगी देताना याबाबतचा निर्णय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समितीने घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील पुरेसा कृत्रिम तलावे उभारून अनंत चतर्थीदिनी गणेश विसर्जनासाठीची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

दरवर्षी आरे कॉलनी गोरेगाव पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व), मालाड (पूर्व) या भागातील गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. येथील आरे वसाहतीमधील तीन मोठे तलाव आणि कृत्रिम तलावात विसर्जन केले जाते. परंतु उच्च न्यायालयाने यावर्षी आरे वसाहतीमधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्य़ास बंदी घातली आहे. त्यामुळे गणपती विसर्जन कुठे करावी, असा प्रश्न येथील भाविकांपुढे निर्माण झाला आहे. येत्या अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन केले जाते.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी कार्यकारी अधिकारी, आरे वसाहत यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र त्यांनी परवानगी फेटाळली. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात भाजपने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यावर निर्णय देताना न्यायालयाने कृत्रिम तलाव उभारणीस परवानगी देताना या बाबतचा निर्णय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समिती यांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in