
जळगाव : मराठा समाजाचा प्रश्न सोडविण्याचा शब्द देत भाजप राज्यात सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर मात्र राज्यातील भाजपा सरकारने या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले, तसेच आरक्षणाच्या विषयावरून ओबीसी आणि आदिवासींमध्ये भांडणे लावण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत बोलताना केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरआले होते.
शनिवारी सकाळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पटोले यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलतांना देशात आणि राज्यात सरकारमध्ये सहभागी असलेला भाजपा हा देश तोडायला आणि संविधान संपवायला निघाला आहे. त्याविरोधात आपले नेतृत्व खा. राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून लढाई पुकारली आहे. देशात आता दुसरी स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई अशा महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. राज्यातील सरकार हे ड्रगमाफियांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलतांना केला. शेतकर्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी देखील या सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाहीये. देशपातळीवर इंडिया आघाडी तयार झाली असून, भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. कुठल्याही परीस्थितीत महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ देणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, , माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, उदय पाटील, आदी उपस्थित होते.
पक्षाने केलेले काम लोकांना सांगण्याची गरज
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, जळगाव जिल्ह्याच्या मातीने काँग्रेस पक्षाला अनेक मोठे नेते दिले , देशातील सर्वोच्च पद इथल्या मातीने भूषविले असून, या मातीत आजही काँग्रेसचा सुगंध पसरला आहे; मात्र मध्यंतरीच्या काळात आपल्यात समन्वय नसल्याने आपण संघटनेत कमी पडलो आणि त्याचा परीणाम आज आपल्याला दिसत आहे. ज्याअर्थी आपले नेतृत्व आज रस्त्यावर उतरून देशवासियांना साद घालत आहे, त्याअर्थी आपण देखिल लोकांमध्ये जाण्याची गरज आहे. काँग्रेसच्या काळात सुईपासून ते रॉकेटपर्यंतची क्रांती झाली. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर नासाने पंडीत जवाहरलाल नेहरूंचा विशेष उल्लेख केला. स्व. राजीव गांधी यांच्या संगणक क्रांतीने देशाची प्रगती झाली. आज सत्तेत असलेले नेतृत्व त्यावेळी संगणक क्रांतीला विरोध करीत होते. काँग्रेस पक्षाने केलेले काम हे लोकांपर्यंत जाऊन सांगण्याची गरज असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.