
एकनाथ शिंदे गटाच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपनेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता ‘लक्ष्य मुंबई महापालिका’ असा निर्धार सोमवारी भाजपच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी यंदाच्या निवडणुकीत १३४ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
फेब्रुवारी २०२२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत; मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगरसेवक, कार्यकर्त्यांची आखणी केली गेली. आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपचे स्वबळावर ८२ नगरसेवक निवडून आले होते. या ८२ जागांसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागांकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला बैठकीत देण्यात आल्याचे समजते.