खातेवाटपावर भाजपचा वरचष्मा; फडणवीस ठरले पॉवरफुल मंत्री,मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास तर फडणवीसांकडे गृह, अर्थखाते

राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खातेवाटप जाहीर केले.
 खातेवाटपावर भाजपचा वरचष्मा; फडणवीस ठरले पॉवरफुल मंत्री,मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास तर फडणवीसांकडे गृह, अर्थखाते
Published on

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. खातेवाटपावर भाजपचा वरचष्मा दिसून आला आहे. त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पॉवरफुल मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहनसह १३ खाती, तसेच इतर कोणत्‍याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही सर्वात महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. महसूल हे खाते भाजपच्या राधाकृष्‍ण विखे-पाटील यांच्याकडे दिले आहे. अद्याप मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्‍तार झालेला नसल्‍याने विस्‍तारानंतर खातेवाटपात आणखीन बदल अपेक्षित आहेत. राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खातेवाटप जाहीर केले.

राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार तब्‍बल ४० दिवसांनंतर ९ ऑगस्‍ट रोजी राजभवन येथे पार पडला. त्‍यानंतर खातेवाटप कधी होणार, हा प्रश्न सातत्‍याने विचारण्यात येत होता. १७ ऑगस्‍टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी खातेवाटप होणार, हे निश्चित होते. त्‍यानुसार अखेर रविवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. दरम्‍यानच्या काळात खातेवाटपाची यादी सूत्रांच्या हवाल्‍याने फिरत होती; मात्र यात अनेक धक्‍कादायक बदल असतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्‍हटले होते. त्‍यानुसार खातेवाटपात काही अनपेक्षित बदल झाले आहेत.

विखे-पाटलांचे प्रमोशन

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्‍या राधाकृष्‍ण विखे-पाटील यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले आहे. महसूल हे खाते भाजपचे ज्‍येष्‍ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाईल, अशी चर्चा होती; मात्र ते विखे-पाटील यांना देण्यात आले आहे. विखे-पाटील यांच्याकडे त्‍यासोबत पशुसंवर्धन आणि दुग्‍धविकास ही खाती देण्यात आली आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.

फडणवीस सर्वात पॉवरफुल

सरकार बनविण्याच्या प्रक्रियेपासून ते मंत्रिमंडळ विस्‍तार तसेच आता खातेवाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच वरचश्मा दिसून आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वात महत्त्वाची म्‍हणजे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. मुख्यमंत्री असताना फडणवीसांकडे पूर्ण पाच वर्षे गृहखाते होते. त्‍यामुळे या खात्‍याच्या सर्व खाचाखोचा त्‍यांना माहिती आहेत. तसेच ज्‍याच्या हातात गृहखाते, त्‍याचाच प्रभाव राजकारणावर राहतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे तत्‍कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्‍त व नियोजन, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृह आणि जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा ही खाती होती. आता ही तिन्ही खाती एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहेत. त्‍याचसोबत राज्‍यातील सत्‍तासंघर्ष न्यायालयात पोहोचला आहे. तसेच विविध समाजाच्या आरक्षणांचे प्रश्नही न्यायप्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर विधी व न्यायदेखील फडणवीस यांनी स्‍वतःकडेच ठेवले आहे.

फडणवीस हे स्‍वतः कायद्याचे पदवीधर असून, त्‍यांना कायद्याचे सखोल ज्ञान आहे. याचा फायदाही सर्व न्यायप्रलंबित प्रकरणे हाताळताना त्‍यांना होणार आहे. राज्‍याच्या सत्‍तासंघर्षात तिजोरीवरील वाढत चाललेल्‍या कर्जाच्या बोजाकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. वित्‍त व नियोजन मंत्री म्‍हणून काम करताना फडणवीस यांच्या या क्षेत्रातील अनुभवाचादेखील कस लागणार आहे. आघाडी सरकारच्या काळात गरिबांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली होती. त्‍याला वेग देण्याचे आव्हान फडणवीसांसमोर असणार आहे. ऊर्जासारखे महत्त्वाचे खातेही फडणवीसांनी स्‍वतःकडेच ठेवले आहे. एकूणच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हेच महत्त्वाचे आणि पॉवरफुल मंत्री ठरले आहेत.

शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांना अपेक्षेनुसारच पाणीपुरवठा व स्‍वच्छता हे खाते देण्यात आले आहे. कृषी खाते मात्र अनपेक्षितरीत्‍या दादा भुसे यांना न देता अब्‍दुल सत्‍तार यांना देण्यात आले आहे. दादा भुसे यांना बंदरे व खणीकर्म हे खाते देण्यात आले आहे. उदय सामंत यांना अपेक्षेप्रमाणेच उद्योग हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. ज्‍यांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून वाद झाला, त्‍या संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे. प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण हे खाते असेल. दीपक केसरकर हे राज्‍याचे नवे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागमंत्री असतील. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्‍पादन तर शंभुराज देसाई यांच्याकडे राज्‍य उत्‍पादन शुल्‍क हे महत्त्वाचे खाते असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in