बँक खाती गोठवून भाजपचा काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत प्रवेश करणार असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी 'एक देश, एक निवडणूक'वरही टीका केली.
बँक खाती गोठवून भाजपचा काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील भाजप सरकारने आपल्या पक्षाची बँक खाती गोठवून काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राइक केला आणि कर दहशतवादाच्या माध्यमातून पक्षाला आर्थिकदृष्ट्या विकलांग केले आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शनिवारी येथे केला.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत प्रवेश करणार असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रमेश यांनी 'एक देश, एक निवडणूक'वरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य 'वन नेशन, नो इलेक्शन' असल्याचा दावाही रमेश यांनी केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मीडिया प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.

भारतात लोकशाही अबाधित राहील का, अशी २०२४ मध्ये भीती वाटत आहे, सत्तारूढ पक्ष निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे निधी गोळा करीत आहे, भाजप हा आता बॉण्ड जनता पक्ष झाला आहे, असेही ते म्हणाले.

२०१४ सारखीच मोदींची गॅरंटी फेकूगिरी - नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपच्या राज्यात हल्ले करण्यात आले. राहुल गांधींना मंदिरात जाऊ दिले नाही. धर्माचे ठेकेदार आपणच असल्याचा अविर्भाव भाजपने दाखवला. पण यात्रा थांबली नाही, महाराष्ट्रात न्याय यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. या न्याय यात्रेतून २५ गॅरंटी दिल्या आहेत, फक्त गॅरंटी नाही, तर वॉरंटीसह आहेत. मोदींची २०१४ ची गॅरंटी खोटी होती, निवडणूक जुमला होता असे भाजपनेच जाहीर सांगून जनतेची फसवणूक केली. भाजपची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी असते, पण काँग्रेस सत्तेत आल्यास या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in