
वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी)मध्ये दोन हेलिपॅड्स उभारण्याची योजना एमएमआरडीएने आखली आहे. हवाई रुग्णवाहिका सेवा तसेच इतर उड्डाणासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये एकूण ४ भूखंड विकसित केले जाणार आहेत. क्रीडांगणासाठी दोन भूखंडाचा विकास केला जाणार आहे, तर दोन भूखंडावर हेलिपॅड विकसित केले जाणार आहेत. मनोरंजन केंद्र उभारण्याचीही योजना आहे. एक हेलिपॅड मनोरंजन केंद्राच्या छतावर तयार केले जाणार आहे, तर दुसरा हेलिपॅड मोकळ्या मैदानावर उभारला जाणार आहे, अशी माहिती एमएमआरआरडीएच्या एका अधिकाऱ्याने दिली.
या सुविधांमधून महसूल मिळवण्याची एमएमआरडीएची योजना आहे. प्रस्ताव आल्यावर महसुली कमाई निश्चित केली जाईल, तथापि, वार्षिक कमाई काही कोटी रुपयांमध्ये असेल. नियोजन अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच एअर अॅम्ब्युलन्ससह हेलिकॉप्टरचे संचालन आणि देखभाल करण्यात निपुण असलेल्या खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले जातील.
१३ वर्षांपूर्वीची योजना आकारास आली नाही !
मुंबई आणि आसपासच्या परिसरात हेलिपॅड उभारण्याचा एमएमआरडीएचा हा पहिलाच प्रयत्न नाही. सुमारे १३ वर्षांपूर्वी एमएमआरआरडीएने वांद्रे, बॅकबे रेक्लेमेशन, नरिमन पॉइंट आणि नेरूळ येथे हेलिपोर्टची योजना आखली होती. मात्र या चारही ठिकाणच्या योजनांना नंतर स्थगिती देण्यात आली. दक्षिण मुंबईत काही हेलिपॅड असले तरी त्यांचा नियमित वापर केला जात नाही. फक्त जुहू एरोड्रोम आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा नियमित वापर केला जातो. मुंबईत हवाई टॅक्सी सेवा विकसित करण्याची योजना होती. मात्र संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्यामुळे ही योजना बासनात गुंडाळण्यात आली.