

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शस्त्र घेऊन जबरदस्तीने प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र या घटनेचा मंगळवारी संध्याकाळी बीकेसीतील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. ही घटना सोमवारी बीकेसीतील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ येथे घडली.
व्यावसायिक परिसर असलेल्या बीकेसीतील या हाय-एंड शॉपिंग मॉलमध्ये तीन संशयितांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मॉलच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले असता, आरोपींनी एक संशयास्पद सरकारी ओळखपत्र दाखवले, रक्षकांशी हुज्जत घातली आणि जबरदस्तीने आत प्रवेश केला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मॉल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलीस ठाण्यात 'सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे आणि घातक शस्त्रासह बेकायदेशीर प्रवेश करणे या कलमांखाली तक्रार नोंदवण्यात आली.
आरोपींनी दाखवलेल्या ओळखपत्राची सत्यता तपासण्यासाठी आणि या घुसखोरीमागील त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे.