

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मनोरंजन केंद्रातील पाच उपाहारगृहांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.
तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत खराब रेफ्रिजरेशन, अन्नाची अयोग्य साठवणूक, अपुरी स्वच्छता, अस्वच्छ परिसर, खाद्यतेलाची अयोग्य तपासणी आणि फूड-ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव यांसारख्या गंभीर त्रुटी आढळून आल्या.
संकल्प, लेनेक्सिस उपाहारगृहांवरही कारवाई
'एफडीए'ने मुंबईतील इतरही अनेक अन्न व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कुर्ला येथील ‘संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित’च्या मध्यान्ह भोजन आणि कॅन्टीनच्या तपासणीत ११२ पैकी केवळ ५३ गुण (४८ टक्के) मिळाले. तेथे अस्वच्छता, खराब झालेली फरशी, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि तापमान नियंत्रणाचा अभाव आढळून आला. माहिम येथील लेनेक्सिस फूडवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या उपाहारगृहात अपुरी हवा खेळती राहण्याची व्यवस्था, एक्झॉस्ट सिस्टीमवर साचलेली काजळी, साचलेले पाणी, गळती आणि अस्वच्छ भांडी आढळल्याने परवाना निलंबित झाला.