उघडे मॅनहोल बंदीस्त करा आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना निर्देश

तीन महिन्यांत उच्च न्यायालयात अहवाल सादर करणार
उघडे मॅनहोल बंदीस्त करा  आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना निर्देश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची अनेक वेळा कानउघडणी केल्यानंतर आता उघडे मॅनहोल बंदीस्त करण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, २१ ऑगस्टपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, मॅनहोल विषयक कार्यवाहीचा पडताळणी अहवाल हा मुंबई उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाकडून विभागनिहाय नियुक्त तज्ज्ञ वकील तसेच संबंधित सहाय्यक आयुक्त हे २१ ऑगस्ट २०२३ पासून संयुक्त पाहणी करतील आणि त्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने माननीय न्यायालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

१४ जून रोजी सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्‍त आणि मध्‍यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना निर्देश दिले होते की, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये, विभाग कार्यालयाच्या अखत्यारितील किंवा मध्यवर्ती खात्यांच्या कार्यक्षेत्रातील मॅनहोलचे सोमवार १९ जून २०२३ पूर्वी सर्वेक्षण करावे. तसेच, एकही मॅनहोल खुले / उघडे राहणार नाही, याची खात्री करावी. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करणे महत्‍त्‍वाचे आहे, असे आयुक्तांनी नमूद केले होते. मुंबई उच्च न्यायालयात मॅनहोल्सबाबत झालेल्या सुनावणीनंतर चहल यांनी सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्‍त आणि मध्‍यवर्ती यंत्रणांचे प्रमुख अभियंता यांना निर्देश दिले आहेत की, आपापल्या अखत्यारितील सर्व मॅनहोल्स सुव्यवस्थितरित्या झाकले आहेत, याची २० ऑगस्ट २०२३ पर्यंत पुन्हा एकदा खातरजमा करावी. तसेच, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ हजार ३०८ मॅनहोल्सवर प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्याची खात्री करावी, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत.

... तर कारवाई होणार!

सर्व संबंधितांनी काटेकोरपणे कार्यवाही पूर्ण करावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in