मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, २४ मार्च रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दुरुस्ती कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्या असून काही लोकल रद्द केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबणार आहेत, तर ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबणार आहेत.
हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून वाशी-बेलापूर-पनवेलला जाणाऱ्या, तर पनवेल-बेलापूर-वाशी स्थानकातून सीएसएमटीला जाणारी लोकल सेवा बंद आहे.
विशेष लोकल
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येत आहेत, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांना दुरुस्ती कालावधीत ठाणे-वाशी-नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.