कर्नाक बंदर पुलात बेस्टच्या सबस्टेशनचा अडथळा सबस्टेशन दुसऱ्या ठिकाणी बांधणार; साडेतीन कोटींचा खर्च

दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर येथील रेल्वेवरील पूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला आहे

मुंबई : ब्रिटीशकालीन १४५ वर्षे जुन्या कर्नाक बंदर पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र रेल्वे हद्दीतील या पुलाच्या कामात बेस्टचे सबस्टेशन अडथळा ठरत आहे. हे सबस्टेशन पाडून महापालिकेच्या रोटा प्रिंटिंग येथे नवीन सबस्टेशन बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका साडेतीन कोटी रुपये खर्चणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर येथील रेल्वेवरील पूल धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला आहे.‌ या पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. सध्या या पुलाचे काम प्रगतीपथावर असून या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामात पूर्व व पश्चिम दोन्ही पोहोच रस्त्याचेही कामही सुरू आहे. परंतु पश्चिमेकडील पोहोच रस्त्याच्या भिंतीला लागून मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमाचे अर्थात बेस्टचे विद्युत वितरण उपकेंद्र (सबस्टेशन) असून या पुलाच्या पोहोच रस्त्यांवरील तोडकाम करून त्याच्या पुनर्बांधणीचे कामात हे उपकेंद्र येत आहे. हे उपकेंद्र कायमस्वरूपी हलविण्याची गरज आहे. त्यानुसार, विद्युत वितरण उपकेंद्र महापालिकेच्या रोटा प्रिंटिंग प्रेस या ठिकाणी ते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वीज उपकेंद्र पर्यायी ठिकाणी जागेत हलवण्यासाठी येणारा खर्च हा ३ कोटी ३८ लाख ९५ हजार ४२९ रुपये एवढा असून बेस्टने हे उपकेंद्र हलवण्यासाठी एवढा खर्च येणार असल्याचे महापालिकेला कळवले आहे. त्यानुसार उपकेंद्र हटवून पर्यायी जागेत स्थानांतरित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा निधी महापालिकेने बेस्टला अदा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in