

मुंबई : मुंबईतील टँकर लॉबी मोडीत काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ३३ हायड्रंटवर डिजिटल फ्लो मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्लो मीटर बसवल्याने किती पाणी वितरित झाल्याचे अचूक मोजमाप करणे शक्य होणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्यातील अनियमितता रोखण्यासह टँकर लॉबीला लगाम घालणे शक्य होणार आहे. टँकर बुकिंगच्या नावाखाली पाणी वितरणातील गडबडी लक्षात घेता वितरण प्रक्रियेवर नियंत्रण आणले जाणार आहे.
मुंबईत विविध सोसायट्या आणि इमारतींकडून पाण्यासाठी टँकर बुक केले जातात. मात्र, बुकिंगच्या नोंदी आणि प्रत्यक्षात वितरित होणारे पाणी यामध्ये तफावत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. टँकर बुकिंगच्या माध्यमातून पाणी वितरणात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे.
या डिजिटल व्यवस्थेअंतर्गत हायड्रंटवर बसविण्यात येणाऱ्या फ्लो मीटरमुळे टँकरमध्ये किती पाणी भरले गेले, याची अचूक नोंद उपलब्ध होईल. बुकिंगच्या नोंदी आणि प्रत्यक्ष वितरित केलेल्या पाण्याचे प्रमाण यांची पडताळणी करणे शक्य होईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या व्यवहारांवर देखरेख ठेवणे आणि तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणे अधिक सुलभ होणार असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
पुरेसा पाणीपुरवठा करणार
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. मुंबईतील डोंगराळ भाग, उंचावर असलेल्या वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत तसेच मुंबईतील अनेक गगनचुंबी इमारती, सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढते.
सोसायटीच्या नावे बुकिंग, पुरवठा भलतीकडेच
मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांकडून टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर होते. प्रत्येक सोसायटी, उंच इमारतीत अधिकृत नळजोडणी असली तरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते. मात्र अनेकदा टँकर माफिया सोसायटीच्या नावे टँकर बूक करतात, मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठा दुसऱ्याच ठिकाणी केला जातो.
एका क्लिकवर कंट्रोल रूमला माहिती
सोसायटी उंच इमारतीत खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोच. पण मुंबई महापालिकेच्या मालकीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे टँकर लॉबी मोडीत काढण्यासाठी आता पाणी भरणा करणाऱ्या केंद्रावरच डिजिटल फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. यामुळे किती पाणी भरले, नेमक्या कुठल्या सोसायटीला पाणीपुरवठा केला याची माहिती एका क्लिकवर कंट्रोल रुमला उपलब्ध होणार आहे. टँकर लॉबीला लगाम घालण्यासाठी पॉलिसी तयार करण्यात आली असून लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.