

मुंबई : मुंबई महापालिकेत सध्या १ लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. दरवर्षी शेकडो कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. मात्र नव्याने कर्मचाऱ्यांची भरती होत नसल्याने मुंबई महापालिकेत अत्यावश्यक खात्यातील ५७९०७ पदे रिक्त आहेत. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतून अत्यावश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत निवेदन देण्यात आल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.
भारत सरकारच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक खात्यातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सुट द्यावी, अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. याबाबत निवडणुक आयोगाचे क्र. ४६४/ आयएनएसटी/ ईपीएस/ २०२३(ई.ओ.) ७ जून २०२३ च्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे.
‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’च्या वतीने आयुक्त अश्विनी भिडे यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर, रंजना नेवाळकर, कार्याध्यक्ष सुनिल चिटणीस, चिटणिस हेमंत कदम, अजय राऊत, मंगल तावडे, संजय वाघ, संदीप तांबे शिष्टमंडळात होते.
कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
मुंबई महापालिकेतील रिक्त शेड्युल्ड पदे न भरल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यातच काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यार्थ पाठवले, तर नागरी सेवा कोलमडून पडतील, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आल्याचे डॉ. संजय बापेरकर म्हणाले.