Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली

चेंबूर येथील झाड दुर्घटनेत सिमेंट काँक्रीट कारणीभूत असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढल्यानंतर हा मुद्दा पुन्हा नव्याने पेटला आहे.
Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली
Mumbai : पावसाळी दुर्घटना रोखण्यात कमी पडलो! 'झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी अभियंत्यांची'; अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची कबुली
Published on

मुंबई : चेंबूर येथील झाड दुर्घटनेत सिमेंट काँक्रीट कारणीभूत असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढल्यानंतर हा मुद्दा पुन्हा नव्याने पेटला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या घमासान चर्चेनंतर अखेर, झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याची जबाबदारी संबंधित विभागातील रस्ते अभियंत्यांची आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.

जुलैतील चार दिवसांच्या पावसात मुंबई महापालिका कमी पडली, अशी कबुली देऊन ते म्हणाले की, मात्र, यातून धडा घेत पुढील आपत्कालीन परिस्थितीत पालिका सज्ज राहील. मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात पावसाळी घटना टाळण्यासाठी उपाययोजना नगरसेवकांनी सुचवणे यासाठी शुक्रवारी १० जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शर्मा यांनी सभागृहात माहिती दिली.

झाडांभोवती काँक्रीट असल्याने मुळांना पाणी, हवा मिळत नाही, असा निष्कर्ष असून सभागृहात सदस्यांनी मत व्यक्त करताना हा प्रश्न उपस्थित केला. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ३ जुलै रोजी परिपत्रक जारी करत झाडा भोवतीचे काँक्रीट काढणे त्या त्या विभागातील रस्ते अभियंत्यांची जबाबदारी असेल स्पष्ट केले आहे. तसेच झाडांची काळजी घेणे, झाडांचे वय, धोकादायक आहे का याचा अभ्यास करत उपाययोजना सूचवण्यासाठी वृक्ष तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती झाडांची वैज्ञानिक पद्धतीने छाटणी, पावसाळ्यात घ्यावयाची काळजी आणि संवर्धनाबाबत मार्गदर्शक सूचना देणार आहे असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.

झाडांच्या छाटणीची निविदा प्रक्रिया दरवर्षी जूनपर्यंत पूर्ण केली जाते. यंदा १३ जूनपर्यंत कायदिश देण्यात आले होते. मात्र १ ते ७ जुलैदरम्यान झालेला विक्रमी पाऊस आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडे पडली. "या आपत्तीतून काही धडे मिळाले असून, ज्या ठिकाणी त्रुटी राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील," असे त्यांनी स्पष्ट केले.

चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळल्याच्या घटनेचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार पुढील कारवाई निश्चित केली जाईल. तसेच साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मंगळवारपर्यंत अपेक्षित आहे. संबंधित कामाचा हमी कालावधी, कंत्राटदाराला देयके अदा झाली होती का, यासह सर्व बाबींची चौकशी केली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

मुंबईतील कायमस्वरूपी जलसाच्याच्या ठिकाणांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नगरसेवकांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात आली असून, नालेसफाईच्या कामाचे "१०० टक्के पूर्ण" असे सांगण्याची पद्धत बदलण्यात येणार आहे. यापुढे प्रत्यक्षात किती टक्के काम पूर्ण झाले, याची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांसमोर मांडली जाईल, असेही अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

झाडांबाबत समिती

फांद्यांची छाटणी, पावसाळ्यात झाडांची काळजी घेणे याबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही विपीन शर्मा यांनी यावेळी केली. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणे व मुसळधार पाऊस यामुळे पडझडीच्या घटना घडल्या, असा दावा त्यांनी केला.

मुंबईत ४० लाख झाडांचा बहर

२०१८ मध्ये मुंबईत वृक्ष गणना केली असता २९ लाख ७५ हजारांहून अधिक झाडे असल्याचे समोर आले. परंतु पुन्हा एकदा नव्याने वृक्ष गणना सुरू केली, या वृक्ष गणनेत १० लाख झाडे वाढतील, अशी अपेक्षा आहे. सध्या सुरू असलेल्या वृक्ष गणनेचा अहवाल २०२८ पर्यंत येणे अपेक्षित असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in