
मुंबई : पालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेले जकात बंद झाल्यावर पालिकेची मदार महसूल करावर अवलंबून आहे. मात्र, मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्या कारणाने पालिकेने जाहिरातीतून महसुल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका मालकीच्या जागा जाहिरात करणाऱ्या कंपनीला देणार आहे. तर, याबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती लवकरच केली जाणार असून यासाठीचे अर्ज मागवण्यात आले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई शहरात पालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून यासाठी येणाऱ्या काळात अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे पालिकेने उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. झोपडपट्टीतील व्यापारी झोपडीला मालमत्ता कर आकारण्यासह झोपडपट्ट्यांमध्ये अधिकृत नळजोडणी देणे, कचरा संकलन कर, अन्य कर लादले जाणार आहेत. त्याशिवाय आता पालिकेच्या मोकळ्या जागेत जाहिरातींसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई परिसरात मेट्रो, भुयारी मेट्रो, वाहतूक पूल अशी विविध प्रकारची विकासाची कामे सुरू असून या माध्यमातूनही महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, असे मत पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून व्यक्त करण्यात आले.