BMC घेणार 'एआय' स्टार्टअप कंपन्यांचे सहाय्य; मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय

पर्यावरण, पाणी, प्रदूषण, आरोग्य आणि उद्यान अशा विभागांतील दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ११ अभिनव स्टार्टअप्स (एआय)च्या मदतीने 'स्मार्ट सोल्यूशन्स' शोधण्याचा निर्णय घेतला आहे.
BMC घेणार 'एआय' स्टार्टअप कंपन्यांचे सहाय्य; मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय
Published on

मुंबई : मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने आपल्या कार्यपद्धतीत नवे तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीद्वारे पर्यावरण, पाणी, प्रदूषण, आरोग्य आणि उद्यान अशा विभागांतील दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ११ अभिनव स्टार्टअप्स (एआय)च्या मदतीने 'स्मार्ट सोल्यूशन्स' शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी या स्टार्टअप्सच्या उपायांचा उपयोग करून मुंबईला अधिक हरित, आरोग्यदायी आणि टिकाऊ बनवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी विविध स्टार्टअप कंपन्यांचा सहभाग करून घेण्यात येणार आहे. एअरएक्स इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनीने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून त्याचे रूपांतर ऑक्सिजन आणि बायोमासमध्ये करणारे उपकरण विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान सूक्ष्म धूळकण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारते. तर, अँपल अर्थ पॅकेजिंग प्रा.लि. या स्टार्टअपने 'भारत री-यूज' या संकल्पनेतून डिस्पोजेबल प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांना पर्याय निर्माण केला आहे. स्मार्ट किऑस्कद्वारे पुन्हा वापरता येणाऱ्या बाटल्यांत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे. एमकेडी टेकवर्क्स एलएलपी यांनी हिंदू स्मशानभूमींसाठी चिमणीविरहित प्रदूषण नियंत्रण प्रणाली' विकसित केली असून, ती हवेतील प्रदूषण ९८ टक्क्यांपर्यंत कमी करते. अशा विविध स्टार्टअपच्या माध्यमातून मुंबईकरांना सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

सॉलटेक डिझाइन लॅब्स प्रा.लि. यांनी वापरातील 'सिंगल युज' प्लास्टिक आणि बांधकामातील कचरा पुनर्वापर करून मजबूत बांधकाम साहित्य तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून, सोलिनस इंटेग्रिटी प्रा.लि. यांनी 'एंडोबॉट' नावाचे रोबोटिक उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण पाण्याच्या आणि मलनिस्सारण पाईपलाइनची आतून तपासणी करून गळती, अडथळे किंवा दूषितता यांचे निदान करते, तर आरका रिसर्च इंडिया प्रा.लि. आणि इंडिकेटर एआय सोल्यूशन्स प्रा.लि. यांनी आरोग्य तपासणीसाठी नॉन-इनवेसिव्ह म्हणजे शरीरात कोणताही छेद न करता कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे तयार केली आहेत. या उपकरणांद्वारे डायबिटीस, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल विकारांचे लवकर निदान शक्य होते. तसेच ट्रीकोटेक एलएलपी या स्टार्टअपने मुंबईतील वृक्षांचे व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी 'एलआयडीएआर' 'एलआयडी आणि 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान प्रत्येक झाडाचे डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करून त्याची वाढ, स्थैर्य आणि संभाव्य धोके यांचे विश्लेषण करते.

मुंबईसारख्या महानगरात वाढत्या पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. मुंबई महापालिका प्रशासन आणि संबंधित ११ स्टार्टअप्सच्या मदतीने आम्ही शाश्वत, स्वच्छ, स्मार्ट मुंबई घडवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने पर्यावरण, पाणी, आरोग्य यादीं समस्यांवर उपाय केले जाणार आहेत.

शशी बाला (व्यवसाय विकास विभागप्रमुख, मुंबई महानगरपालिका)

logo
marathi.freepressjournal.in