

मुंबई : कर्करोग निदानानंतर उपचारांच्या गुंतागुंतीमुळे अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडतात. ही समस्या टाळण्यासाठी आणि रुग्णांना उपचारादरम्यान योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक पाऊल उचलले आहे. पालिकेच्या २४ प्रशासकीय वॉर्डांमध्ये आता २४ विशेष प्रशिक्षित कॅन्सर पेशंट नेव्हिगेटर नियुक्त करण्यात येणार आहेत.
हे कर्मचारी टाटा मेमोरियल सेंटरच्या (टीएमसी) 'पेशंट नेव्हिगेशन इन ऑन्कोलॉजी केअर' कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित झाले आहेत. पालिकेच्या कर्करोग शोध मोहिमेद्वारे ज्या रुग्णांचे निदान होईल, त्यांना योग्य उपचार, संदर्भ, समुपदेशन आणि उपचारांनंतरची काळजी देण्याचे काम हे नेव्हिगेटर्स करतील.
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, हे २४ व्यावसायिक आधीपासूनच पालिकेच्या कर्करोग शोध कार्यक्रमाचा भाग आहेत. आता त्यांना विशेष प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते रुग्णांना उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यास सज्ज आहेत. शुक्रवारी टाटा मेमोरियल रुग्णालयात आयोजित दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. रुग्णांना रुग्णालयांत पाठवल्यानंतर भीती वाटते किंवा ते गोंधळून जातात. आमचे नेव्हिगेटर्स निदानापासून रुग्णांच्या पाठीशी उभे राहतील. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे, उपचारांचे पर्याय, खर्चाची माहिती देणे आणि योजनांची मदत मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही डॉ. शहा यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण मॉडेल्सची गरज
देशातील वाढती लोकसंख्या आणि कर्करोगाचा वाढता भार पाहता आरोग्य सेवेमध्ये अशा नावीन्यपूर्ण मॉडेल्सची गरज आहे, असे टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. या उपक्रमामुळे कर्करोग उपचारांची सुलभता वाढण्यासोबतच प्रत्येक नागरिकाला समान आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सेतू म्हणून काम करणार नेव्हिगेटर्स
टाटा मेमोरियल सेंटर आणि 'इको इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने 'कॅन्सर केअर भारत' उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना टीएमसीचे प्राध्यापक आणि माजी संचालक डॉ. आर. ए. बडवे म्हणाले की, सुमारे ३,००० कर्करोग रुग्णांवर केलेल्या अभ्यासातून 'पेशंट नेव्हिगेटर'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे समोर आले आहे. 'रुग्णांना हे नेव्हिगेटर्स वैद्यकीय पथकातील सदस्य वाटतात, तर डॉक्टरांना ते रुग्णांच्या कुटुंबाचाच एक भाग वाटतात. हा 'सेतू' या कार्यक्रमाचा पाया आहे, असे ते म्हणाले.