

मुंबई : ससून डॉक आणि जमशेदजी बंदर परिसरातील समुद्रातील तरंगता कचरा यांत्रिक पद्धतीने हटविण्यासाठी आणखी दोन मानवरहित बोटींचा पुरवठा, संचालन आणि देखभाल करण्यास ३.६ कोटींच्या प्रकल्पाला मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.
याच वर्षी मे महिन्यात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथे दोन मानवरहित विद्युत बोटी तैनात केल्या होत्या. या उपक्रमाचे स्वागत करताना कुलाबा येथील भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले की, या बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा केला जात आहे.
त्यामुळे याठिकाणी प्रयोग यशस्वी झाल्याने अन्य ठिकाणी अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
अर्थसंकल्पातही तरतूद
मुंबईतील प्रमुख बंदर परिसरातील प्लास्टिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि बंदर प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पर्यावरण स्वच्छता मोहिमेअंतर्गत या प्रकल्पासाठी ३.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंचलित अथवा दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणाऱ्या विद्युत आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटींच्या माध्यमातून समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यात येणार आहे. या प्रकल्पाला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची मंजुरी मिळाली असून अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग निविदेच्या अटी व शर्ती निश्चित करण्याचे काम करीत असून लवकरच निविदा काढण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.
बॅटरी, सौर पॅनेलही बोटी चालतात
मनुष्यबळाच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे या मानवरहित वाहनाचा वापर केला जात असून ते दूरस्थ पद्धतीने नियंत्रित केले जाते. समुद्र किनारी आढळणारा कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर पुनर्वापरासाठी पाठवण्यात येतो. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीने परिसराचे सौंदर्य वाढण्यास तसेच समुद्रातील प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. या बोटींची कार्यकक्षा सुमारे ५०० मीटर असून त्या बॅटरीवर चालतात. त्यावर सौर पॅनेलही बसवण्यात आले आहेत, असे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.