

मुंबई : मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत ३०० चौरस फुटांची १२ हजार घरे बांधणार आहे. दोन टप्प्यात ही घरे बांधण्यात येणार असून यासाठी १,१२० कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत २९ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. ‘स्वच्छ व सुंदर मुंबई’साठी सफाई कामगार दिवसरात्र झटत असतात. मुंबईची स्वच्छता करत असताना अनेक कामगारांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सफाई कामगारांसाठी ‘आश्रय’ योजनेंतर्गत घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत. ३०० चौरस फुटांची सुमारे १२,००० सेवानिवासस्थाने दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात, ‘ए’ विभागातील कोचिन स्ट्रीट, आर/दक्षिण विभागातील पॉवेल्स लँड व ‘ई’ विभागातील सिद्धार्थनगर या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले असून त्या सफाई कामगारांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तसेच, ‘ई’ विभागातील टँकपाखाडी आणि एफ/दक्षिण विभागातील गौतम नगर या ठिकाणी कर्मचारी निवासस्थानांच्या पुनर्विकासाची कामे प्रगतिपथावर आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात ३० ठिकाणांच्या कामांचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत, ज्यापैकी २३ ठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरु करण्यात आली आहेत आणि उर्वरित ७ ठिकाणची कामे लवकरच सुरु होणार आहेत.