BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

मुंबई महापालिकेत उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातून मुलाखतीद्वारे पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक होणार आहे. यासाठी शेवटच्या ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १२ अभियंत्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेत उपप्रमुख अभियंता व कार्यकारी अभियंता संवर्गातून मुलाखतीद्वारे पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक होणार आहे. यासाठी शेवटच्या ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १२ अभियंत्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्ज हे उपप्रमुख आणि कार्यकारी अभियंता संवर्गातील आहे. या सर्व अर्जाची छननी करून पात्र उमेदवारांची १० आणि १२ नोव्हेंबर रोजी मुलाखत घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून आलेल्या ७ ते ८ नव्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरित विभागात आजही प्रभारी आणि अतिरिक्त कार्यभार असलेले सहाय्यक आयुक्त कार्यभार सांभाळत आहेत. यापैकी काही प्रभारी सहाय्यक आयुक्त हे कार्यकारी अभियंता संवर्गातील आहेत. ते वॉर्डातील कारभार सांभाळण्यास असमर्थ ठरत आहेत. यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पूर्णकालिक कार्यभार तत्त्वावर सहाय्यक आयुक्त नेमणुकीचे आदेश निर्गमित केले होते.

सोमवार व मंगळवारी मुलाखती

पूर्णकालिक तत्त्वावरील सहाय्यक आयुक्त पदासाठी उपप्रमुख अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे उपरोक्त अर्जाची छाननी करून त्यामधून महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांच्या दालनात मुलाखती पार पडणार आहे. या मुलाखतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबरच्या अखेरीस पालिकेच्या वॉर्डात नेमणूक करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in