

मुंबई : वडाळा येथील कोरबा मिठागर येथील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी बालकामगाराचा वापर करणे कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. मुंबई पालिकेने कारवाईचा बडगा उगारत थेट दोन निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यावर बंदी घातली असून नोंदणीही रद्द करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील कोरबा मिठागर नाल्यातील गाळ काढणे व स्वच्छता कामाच्या अंमलबजावणी दरम्यान बालकामगारांचा वापर केल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदार कंपनीवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मेसर्स व्योम कॉर्पोरेशन (सी-२०३, एक्सलन्सी हाईट्स, मीरा भाईंदर, भाईंदर पूर्व, ठाणे) असे कारवाई केलेल्या कंत्राटदार कंपनीचे नाव आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत शहर विभागातील परिमंडळ-२ अंतर्गत एफ. उत्तर, एफ. दक्षिण, जी. दक्षिण व जी. उत्तर प्रशासकीय विभागातील प्रमुख नाल्यांमधील गाळ काढणे व स्वच्छता करण्याचे काम २०२५-२६ व २०२६-२७ या कालावधीसाठी सोपविण्यात आले होते.
या कंत्राटांतर्गत एफ. उत्तर विभागातील कोरबा मिठागर नाल्याच्या स्वच्छतेच्या कामात कंत्राटदार कंपनीकडून बालकामगारांचा वापर करण्यात आल्याच्या तक्रारी/व्हिडीओ चित्रफीती महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदारास खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली. कोरबा मिठागर नाल्याच्या कार्यस्थळी व्हिडीओ चित्रफितीत दिसणारे कामगार अथवा बालके कंपनीमार्फत नियुक्त, कार्यरत किंवा तैनात करण्यात आले नव्हते, असा खुलासा कंत्राटदार कंपनीने केला. तसेच, मजूर पुरवठादार यांनी दिलेले घोषणापत्रही सादर केले.
हा खुलासा असमाधानकारक असल्याचे आढळल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. नाल्यांतील गाळ काढण्याच्या कामात बाल कामगारांचा वापर करून कंत्राटातील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत उत्तर सादर करण्यास नोटिसीद्वारे निर्देश देण्यात आले.
संबंधित कंत्राटदाराने पुन्हा लेखी उत्तर सादर करून यापूर्वी केलेल्या खुलाशाचा पुनरुच्चार केला. प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रफितीमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती आपल्या कार्यालयातील नसून त्या व्हिडीओ चित्रफितीचा आपल्या कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा कंत्राटदार कंपनीने केला.
कंत्राटदारावर शिस्तभंगाची कारवाई
तसेच अभिलेखावरील उपलब्ध कागदपत्रे, 'कारणे दाखवा' नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्रफित, तसेच कंत्राटदाराने सादर केलेले लेखी निवेदन यांचा विचार करून महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदाराविरोधात शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटाच्या अंमलबजावणीदरम्यान बालकामगारांचा वापर करण्यात आल्याचे सिद्ध होत असल्याने कंत्राटदार कंपनीस महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत व कामांमध्ये सहभागी होण्यास दोन वर्षांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच, त्यांची कंत्राटदार म्हणून असलेली नोंदणीही रद्द करण्यात आली आहे.