BMC Budget 2025 : आरोग्यसेवेसाठी ७,३८०.४४ कोटी; वार्षिक तुलनेत १८९.३१ कोटींची वाढ

२०२५-२६ आर्थिक वर्षासाठी मुंबई पालिकेने आरोग्यसेवेसाठी ७,३८०.४४ कोटी रुपयांची तरतूद केली असून ती २०२४-२५ च्या ७,१९१.१३ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम १८९.३१ कोटी रुपयांनी वाढली आहे.
BMC Budget 2025 : आरोग्यसेवेसाठी ७,३८०.४४ कोटी; वार्षिक तुलनेत १८९.३१ 
कोटींची वाढ
Published on

२०२५-२६ आर्थिक वर्षासाठी मुंबई पालिकेने आरोग्यसेवेसाठी ७,३८०.४४ कोटी रुपयांची तरतूद केली असून ती २०२४-२५ च्या ७,१९१.१३ कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम १८९.३१ कोटी रुपयांनी वाढली आहे. पालिकेच्या आरोग्य अर्थसंकल्पात सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत काही आरोग्य केंद्रे चालवण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये कर्करोग तपासणी क्लिनिक स्थापन करण्याची योजना आहे. मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी भागातील ३३ आरोग्य केंद्रांवर केंद्र स्थापन केली जाणार असून मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

शून्य प्रिस्क्रिप्शन धोरणाची यावर्षी अंमलबजावणी होणार

२०२५-२०२६ करिता आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर पालिकेच्या वतीने अंदाजित खर्चासाठी ७,३८०.४३ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी ६,३५०.५३ कोटी रुपयांची तरतूद होती. मुख्य, उपनगरीय रुग्णालयांचे नूतनीकरण व पुनर्विकास पूर्ण करण्याकडे पालिकेने यावर्षी अधिक लक्ष दिले आहे. मागील वर्षातील प्रलंबित वर्ष २०२९ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न यंदाच्या आरोग्य विभागाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पालिकेच्या रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर ३,५१५ रुग्णशय्यांची भर पडणार आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये एकूण खाटांची संख्या ४९ हजार ८९३ होईल. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, पोटाचे विकार यासाठी उपनगरी रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा सुरू होणार आहेत. २५ एचबीटी क्लिनिकची सुरुवातही येत्या वर्षात होणार आहे. तर राजावाडी रुग्णालयावरील वाढता रुग्णभार लक्षात घेता त्याचा विस्तार आणि पुनर्विकास यांची मागणी आहे. यासाठी ५० कोटींची तरतूद केली असून नोव्हेंबर २०२९ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. विक्रोळीच्या के. एम. जे. फुले महापालिका रुग्णालयाच्या पूर्ततेसाठी ऑक्टोबर २०२७ची कालमर्यादा ठेवण्यात आली आहे. सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास आणि कामाठीपुरा येथील मुरली देवरा नेत्ररुग्णालय, ई प्रभागातील बहुद्देशीय रुग्णालयाचे १८ टक्के काम पूर्ण झाले असून ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होईल. त्यासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद आहे. कुर्ला पश्चिम येथील संघर्ष नगरमध्ये सर्वसामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीचा पाया रचण्याचे काम झाले असून जुलै २०२६ मध्ये ही इमारत तयार होईल. त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात शून्य प्रिस्क्रिप्शन धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पुढील दोन वर्षासाठी दरसूची अंतिम करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

पालिकेचे नियोजन 

रुग्णांना आणखी २५ HBT Clinics आणि ३ फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्याचे नियोजिले आहे.

आरोग्य सेवांकरिता सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) धोरणांतर्गत, पहिल्या टप्प्यात ५ आरोग्य सुविधांचे ३० वर्षांपर्यंत प्रचलन व परिरक्षण करण्याकरिता खाजगी संस्थांकडून स्वारस्य अभिरुची मागविण्यात येतील.

टप्पा-२ मध्ये मुख्य रुग्णालयाच्या इमारतीसह रेडिएशन (लिनियर एक्सिलरेटर) उपचार सुविधेचा समावेश असलेल्या स्वतंत्र समर्पित आँकोलॉजी इमारतीचे काम लवकर करण्यात येणार आहे.

केईएम रुग्णालयातील निवासी विद्यार्थ्यांसाठी वडाळा येथील ॲक्वर्थ रुग्णालय परिसरात वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. 

२०२५-२६ मध्ये DNB पदवी (कान, नाक, घसा) व DNB पदविका (बधिरीकरणशास्त्र) अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

तोंड, स्तन आणि गर्भाशयमुख यांच्या कर्करोग नियंत्रणाकरिता ‘विभागनिहाय सर्वसमावेशक कर्करोग सेवा मॉडेल’द्वारे सेवांची व्याप्ती वाढवणार आहे.

२०२५-२६ मध्ये ९ ते १४ वर्ष वयोगटातील शाळकरी मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील HPV लसीकरण प्राथमिक तत्वावर करणार आहे.

नवीन BPaL औषधपद्धती आणि XDR Cartridges चाचणी. कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रायोगिक तत्त्वावर Targeted Next Generation Sequencing चाचणी करणार आहे.

क्षयरुग्णांच्या रक्तांमधील औषधांचे प्रमाण तपासण्यासाठी Therapeutic Drug Monitoring उपलब्ध होणार आहे.

कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि पाठपुरावा करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३८ 'माँ मित्र' हेल्पडेस्क सुरू करण्यात येणार आहेत.

विनामूल्य स्वयंचलित व्हॉईस कॉल्स व एसएमएसच्या माध्यमातून गर्भवती महिलांचे समुपदेशन करणार आहे.

एक वर्षापर्यंतच्या बाळांच्या संपूर्ण लसीकरणासाठी कॉल केले जातील. झोपडपट्टी भागातील किशोरवयीन मुला-मुलींच्या मानसिक, प्रजनन व आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ३३ आरोग्य केंद्रांमध्ये किशोर केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

सेठ ए.जे.बी. पालिका रुग्णालयामध्ये मूकबधीर मुलांच्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करणार आहे.

पालिका रुग्णालयाचा विस्तार  

मुलुंड (प.) येथील म.तु. अगरवाल रुग्णालयाची पुनर्बांधणी - मार्च २०२५ 

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय संकुलातील नवीन रुग्णालय इमारतीचे बांधकाम - मार्च २०२५

बोरिवली (प.) येथील हरिलाल भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास - मे २०२५

के.बी. भाभा रुग्णालय, वांद्रे (प.) येथील नवीन बाह्यरुग्ण इमारतीचे बांधकाम व जुन्या रुग्णालय इमारतीच्या मोठ्या दुरुस्तीचे काम -  मार्च २०२६ 

गोरेगांव (प.) येथील सिद्धार्थ म्युनिसिपल सर्वसाधारण रुग्णालयाची पुनर्बांधणी - एप्रिल २०२६ 

संघर्ष नगर, कुर्ला (प.) येथील नवीन सर्वसाधारण रुग्णालय आणि कर्मचारी वसाहत इमारतीचे बांधकाम - जुलै २०२६ 

कांदिवली (प.) येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, निवासी वसतिगृह व इतर इमारतीचे बांधकाम - नोव्हेंबर २०२५

भांडुप मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम -  मे २०२६ 

घाटकोपर (पू.) येथील राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास - नोव्हेंबर २०२९ 

विक्रोळी येथील क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास - ऑक्टोबर २०२७ 

ई विभागातील कामाठीपुरा येथील सिद्धार्थ/मुरली देवरा नेत्र रुग्णालयाची (मल्टीस्पेशालिटी रुग्णालय) पुनर्बांधणी - नोव्हेंबर २०२५ 

कांजूरमार्ग (पू.) येथील माता व बालक आणि स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम - मे २०१७

logo
marathi.freepressjournal.in