
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमासाठी मुंबई पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. २०२५-२६च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्ट (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने वेळोवेळी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. जानेवारी २०१२ पासून जानेवारी २०२५ पर्यंत ११,३०४.५९ कोटींची आर्थिक मदत केली आहे, तर यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमाने हाती घेतलेले प्रकल्प यासाठी १ हजार कोटी रुपयांचे अनुदानाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही रक्कम टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाला आदा करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली. राज्याच्या निर्देशांनुसार मुंबईसाठी बेस्ट उपक्रमाच्या २ हजार इलेक्ट्रीक बसचे प्रवर्तन करण्यासाठी आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने पालिकेचा ५ टक्के हिस्सा, १२८.६५ कोटी रुपये यासाठी आहेत. मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजात, स्वतःच्या आर्थिक जबाबदाऱ्या असतानाही बेस्टच्या आर्थिक स्थितीचा विचार करून ही तरतूद करण्यात आली आहे, असे पालिकेने नमूद केले.
२०१२-१३ पासून आर्थिक सहाय्य
बेस्टला पालिकेने २०१२-१३ पासून एकूण ११,३०४.५९ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले आहे. आर्थिक स्थितीत असलेल्या बेस्टचा सध्याचे एकूण संचयी तोटा ९,५०० कोटी रुपये आहे. बेस्ट हा उपनगरीय रेल्वे खालोखाल मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सार्वजनिक वाहतूक उपक्रम आहे. ३ हजार बसद्वारे दररोज ३० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.
वित्त आयोगाचे २५० कोटी रुपये देणे
विद्युत बस गाड्यांच्या खरेदीसाठी १५व्या वित्त आयोगाकडून १,९९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १,७४२ कोटी रुपये आदा करण्यात आले आहे. तर उर्वरित २५० कोटी रुपये लवकरच बेस्ट उपक्रमास देण्यात येतील, असे डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.