

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांसाठी धाव घेतात ते अग्निशमन दलाचे जवान. अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा ११९ कोटींनी ही तरतूद वाढवण्यात आली असून मुंबई कोस्टल रोडजवळ नवीन अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे.
आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र त्यातुलनेत आगीच्या घटनांचे सत्र वाढले आहे. झोपडपट्टी, उत्तुंग इमारती, कार्पोरेट कार्यालये, हॉटेल आणि रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांचा नाहक बळी जात आहे. परिणामी मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात अग्निशमन दल विभागाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी २३०.९० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी ही तरतूद फक्त १११.६८ कोटी होती.
नवीन वाहने/उपकरणे
उत्तुंग इमारतींमधील आग विझविण्यासाठी ५ हायराईझ फायर फायटिंग वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.
उत्तुंग इमारतींमध्ये अग्निशमन व विमोचन कार्याकरिता, ३२ मीटर व ४० मीटर उंचीचे प्रत्येकी १ टर्न टेबल लॅडर अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २४ मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म व हायराईझ फायर फायटिंग पंप्स असलेली ४ प्रथम प्रतिसादात्मक वाहने लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
२५० मीटर उंचीपर्यंत पाणी पोहोचवू शकतील, अशी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ११ प्रथम प्रतिसादात्मक अग्निशमन वाहने दाखल होतील.
आपत्कालीन परिस्थितीकरिता प्रकाशव्यवस्था व उच्च दाबाचे पाण्याचे पंप असणारी ४ सहाय्यक वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
३ टर्न टेबल लॅडर, ८ जंबो टँकर्स आणि ३ फोम टेंडर्सच्या जागी टप्प्याटप्प्याने नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.
उत्तुंग इमारतींमध्ये पारंपारिक अग्निशमन यंत्रणा प्रभावी ठरत नसल्याने कॉम्प्रेस्ड एअर फोर्स सिस्टिम व ड्रोन यांसारख्या नवीन अग्निशमन यंत्रणा समाविष्ट करण्याचे नियोजिले आहे.
नवीन अग्निशामन दल कार्यान्वित होणार
एलबीएस मार्ग, कांजूरमार्ग (प.) येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. जुहू तारा रोड सांताक्रुझ (प.), माहूल रोड चेंबूर व टिळक नगर येथील नवीन अग्निशमन केंद्रांचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम
हवामान बदलामुळे वाढत्या तीव्रतेचा पाऊस आणि समुद्रपातळीत होणारी वाढ यामुळे मुंबई शहराला पावसाळ्यात सखल भागांमध्ये पूरस्थितीचा धोका भेडसावत आहे. यासाठी आता महापालिकेने ‘शहरी पूर जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम’ तयार केला असून त्यामध्ये असंरचनात्मक व संरचनात्मक उपाययोजनांचा समावेश आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आर्थिक सहाय्यक मिळविण्याकरिता केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.