मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला सन २०२६ - २७ चा ८० हजार ९५२.५६ कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना बुधवारी सादर केला. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाचा आकार आधीच्या वर्षाच्या तुलनेत १९.३५ टक्क्यांनी जास्त होता. परंतु, यंदा ही वाढ केवळ ८.७७ टक्क्यांनी अधिक आहे.
मुंबईकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असला तरी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च भागवण्यासाठी विविध बँकांमधील ठेवीतून १३ हजार ७६५.७४ कोटी रुपये कर्ज स्वरुपात घेण्यात येणार आहेत. तर विविध प्रकल्पांसाठी ‘एफडी’तील राखीव निधीतून १४ हजार २९५.८६ कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. विविध बँकांमध्ये प्रकल्प व अन्य कामांसाठी ३६ हजार कोटी रुपये राखीव निधी आहे, त्या ठेवीतून २८ हजार ०६१.६ कोटी रुपये विविध विविध प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार असल्याने मुंबई महापालिकेवर ‘एफडी’तून कर्ज घेण्याची वेळ ओढवली आहे.
विविध बँकांमधील ठेवीतील रोख रकमेचा ताळमेळ राखला गेला नाही तर ‘एफडी’तून कर्ज स्वरुपात रक्कम घेण्यात येईल, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्टोबर २०२६ पासून करमणूक कर आकारणी करण्यात येणार आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेचा सन २०२५ - २६ अर्थसंकल्प तीन वर्षांनंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. यंदा अर्थसंकल्प ८९.८४ कोटी रुपये शिल्लकीचा सादर करण्यात आला. सन २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पात विकासकामावरील वाढता खर्च भागवण्यासाठी प्रशासकीय खर्चाला कात्री लावण्याचे संकेत त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून दिले आहेत. चार दशकांनंतर मुंबई महापालिकेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसलेला मुंबईकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे.
मुंबई महापालिकेचे कोस्टल रोड दक्षिण आणि उत्तर , गोरेगाव - मुलुंड लिंक रोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पूल खात्याची कामे, प्रस्तावित गारगाई, पिंजाळ पाणी प्रकल्प. पाणीपुरवठा प्रकल्प, भूखंडाचा पुनर्विकास, रुग्णालय, आरोग्य खाते, बाजार उद्यान खाते, प्राणी संग्रहालय, पर्जन्य जलवाहिन्यांशी निगडीत कामे, घनकचरा आदी संदर्भातील कामांसाठी २,४४,५५२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ४१,३९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला सदर प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी मुदत ठेवी मोडणे, अंतर्गत कर्ज उभारणे, बॉण्ड्स काढणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे आदीं उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.
आर्थिक शिस्तीचा अर्थसंकल्प - ॲड. आशिष शेलार
पायाभूत सेवासुविधा भक्कम करतानाच मागील २५ वर्षे तत्कालीन सत्ताधीशांमुळे बिघडलेली आर्थिक शिस्त लावणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी विकासकामांसाठी ४८ हजार १६४ कोटी २८ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
करमणूक कर आकारणीचा प्रस्ताव
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करमणूक कर आकारणी करण्यात येणार असून नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नगरविकास विभागांची अधिसूचना जारी झाल्यानंतर त्या तारखेपासून करमणूक कर आकारणी करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये (कोटी रुपयात )
शिक्षण विभाग - ३,४५६.७३
घनकचरा व्यवस्थापन - ५,७८०.४१
पर्जन्य जलवाहिनी - २,६८६.०२
अग्निशमन दल - ६९९.९०
रस्ते व वाहतूक प्रचलन - ८,५०८.१५
पूल विभाग - ९,८५२.१८
आरोग्य विभाग - १,९३५.०१
प्रमुख रुग्णालय -२,४७५.२९
उपनगरीय रुग्णालय - १,४०२.०६
मलनिस्सारण प्रकल्प - ६,६६४.६३
पाणीपुरवठा - ६,५२९.८७
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
महापालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत
जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता १४३९८.१६ कोटी व आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता १५५५०.०२ कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ११९८१.८४ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मालमत्ता कर मार्च २०२७ पर्यंत ७ हजार कोटी रुपये अपेक्षित!
मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे आणखीन एक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. मालमत्तांचे करनिर्धारण भांडवली मूल्याधारित करप्रणालीनुसार करण्यात येते. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मालमत्ता करापोटी अंदाजिलेले ५२०० कोटी इतके उत्पन्न आता ६२०० कोटी असे सुधारित करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ४८१२.३४ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कराच्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ७००० कोटी इतके प्रस्ताविले आहेत.
गुंतवणुकीवरील व्याज
गुंतवणुकीवरील व्याजापोटी आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता २२८३.८९ कोटी व आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता २५७२.२३ कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. आगामी वर्षामध्ये १२.६२ टक्के म्हणजेच १२८८.३४ कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. ३१.०१.२०२६ पर्यंत १२१००.५६ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे.
महसुली खर्च!
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता महसुली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३१२०४.५३ कोटी वरुन २८२५७.९१ कोटी असे सुधारित करण्यात आले असून सदर अंदाजामध्ये १२९४६.६२ कोटी इतकी घट झाली आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत १९००१.८८ कोटी इतका प्रत्यक्ष महसुली खर्च झाला असून तो सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत ६७.२४ टक्के इतका आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये महसुली खर्चाकरिता ३२६९८.४४ कोटी इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहेत.
भांडवली खर्च !
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹४३१६२.२३ कोटी वरुन ३९१५९.५१ कोटी असे सुधारित करण्यात आले आहेत. दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत २२४२५.१६ कोटी इतका प्रत्यक्ष भांडवली खर्च झाला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चासाठी ४८१६४.२८ कोटी रुपये इतके अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताविण्यात आले आहे.
सुधारित एकवेळ अधिमूल्य धोरण !
मुंबई महापालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागावरील इमारतींच्या पुनर्विकासातून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) / हस्तांतरणीय विकास हक्क (TDR)/फंजिबल चटई क्षेत्र निर्देशांक (Fungible FSI) यापोटी निवासी वापरासाठी घेतले जाणारे एक वेळ अधिमूल्य ५ टक्क्यावरुन ७.५ टक्के तसेच अनिवासी वापरासाठी १० टक्क्यावरून १२.५ टक्के इतके वाढविण्यात आले आहे. ही सुधारणा महसूल वाढविण्याचा एक महत्वाचा उपाय असून यामुळे महापालिकेच्या मक्त्याने दिलेल्या भूभागाच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होणे अपेक्षित आहे. सन २०२५-२६ मध्ये, प्रचलित धोरणाच्या तुलनेत १२६ कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.
भूखंड भाडेतत्वावर देण्याकरिता लिलाव !
मुंबई महापालिका छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मुंबई व अस्फाल्ट प्लांट, वरळी येथील भूखंडांच्या अनुक्रमे ३६९ कोटी व ७८३ कोटी इतक्या किंमतीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. लोअर परळ विभागातील भू.क्र.१५४६ या भूखंडाचा १३४८ कोटी इतक्या मूळ/आधारभूत किंमतीने लिलाव करण्याकरिता निविदा प्रसारित करण्यात आली आहे.
विकास नियोजन खात्याकडून १२,०५० कोटींचे उत्पन्न
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये, विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या महसूलापोटी ९७०० कोटी इतके उत्पन्न अंदाजिले होते, ते १११५३.७५ कोटी असे सुधारित करण्यात आले आहे. त्यामुळे १४.९९ टक्के म्हणजेच १४५३.७५ कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पालिकेला म्वोम्कर करापोटी ८१३८.२६ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये, विकास नियोजन खात्याकडून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज १२०५० कोटी इतके प्रस्ताविले आहेत.
जल आणि मलनिःसारण आकार
जल आणि मलनिःसारण आकारापोटी आर्थिक वर्ष २०२५-२६ करीता २३६३.१५ कोटी व आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता २३९३.४६ कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत १३३३.५८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे.
ग्रीन बॉण्ड्स !
महापालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प यासारख्या शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेने ग्रीन बॉण्ड्स निर्गमित करण्याचे योजिले आहे. सदर उपक्रम भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी तसेच नेट झिरो या ध्येयाशी सुसंगत असून मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याची अंमलबजावणी सुलभ होईल. यामुळे, पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासकीय या बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे संस्थात्मक गुंतवणूकदार आकर्षित होतील.