BMC Budget 2026 : शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ४२४८.०८ कोटींचा; शालोपयोगी वस्तूंचा पुरवठा सुरूच राहणार

मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा शिक्षण विभागाचा अंदाजीय अर्थसंकल्‍पीय बुधवारी पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना सादर केला. हा अर्थसंकल्प ४२४८.०८ कोटी रुपयांचा असून यामध्ये विविध योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
BMC Budget 2026 : शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ४२४८.०८ कोटींचा; शालोपयोगी वस्तूंचा पुरवठा सुरूच राहणार
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा शिक्षण विभागाचा अंदाजीय अर्थसंकल्‍पीय बुधवारी पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना सादर केला. हा अर्थसंकल्प ४२४८.०८ कोटी रुपयांचा असून यामध्ये विविध योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी देण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम यंदाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज अनुक्रमे ३७५८.०८ कोटी आणि भांडवली खर्च ४९० कोटी इतकी प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात २९२.४४ कोटी रुपयांची अधिकची तरतूद केली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळात महापालिका शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम पुढील शैक्षणिक वर्षातही कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा, मुलींचा उपस्थिती भत्ता, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसअंतर्गत मोफत प्रवास, शालेय आरोग्य कार्यक्रम, सॅनिटरी नॅपकिन, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अशा विविध योजना कायम ठेवण्यात आल्या आहेत.

२०२६-२७ व २०२७-२८ या वर्षांकरीता विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीची निविदा प्रक्रिया उपप्रमुख अभियंता यांच्यामार्फत सुरू आहे. यासाठी प्राथमिक विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूद १५०.५७ कोटी तर माध्यमिकसाठी अर्थसंकल्पीय तरतूद ३७ कोटी करण्यात आली आहे. विद्यार्थीनींसाठी मुदत ठेव योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनींना प्रवेशाच्या प्रमाणानुसार किमान १ आणि कमाल ५ हजार याप्रमाणे एकूण १२,१४८ विद्यार्थीनींना भारतीय डाक विभागाद्वारे मुदतठेव प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बसअंतर्गत मोफत प्रवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या इयत्ता पहिली ते दहावीतील गणवेशधारी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ते शाळेपर्यंत बेस्टमार्फत मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पर्यावरण संवर्धन उपक्रम

विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी व शाश्वत सवयी विकसित करण्यासाठी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘इको वॉरियर्स’ शैक्षणिक पुस्तकांसह पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात येणार आहे.

खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ५५ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये आणखी ४० शाळांची भर टाकण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात प्राथमिकसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in