

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हा अर्थसंकल्प नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर करणार आहेत. सन २०२४-२५ चा ७४ हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प १४.२९ टक्क्यांनी अधिकच होता. त्यामुळे सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा ८० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असून करदात्या मुंबईकरांना काय मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनाने आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे समजते.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी ४ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येतो. परंतु यंदा मुंबई महापालिका निवडणूक, त्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. मात्र आता स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे विराजमान झाले असून पालिका आयुक्त शिंदे यांना हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेने मूलभूत सुविधांसह पायाभूत सुविधांच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थितीत मुंबई महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू असून विविध बँकांमधील ठेवी मोडीत काढत कर्ज काढण्याची वेळ मुंबई महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. तरी मुंबई महापालिकेने पायाभूत सुविधांवर भर दिला असून यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी भरीव तरतूद
रस्ते आणि वाहतूक
वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन
आरोग्य विभाग
पर्जन्य जलवाहिन्या
प्राथमिक शिक्षण
बेस्ट अनुदान
शिक्षण विभाग
प्रमुख रुग्णालये
वैद्यकीय महाविद्यालये
विशेष रुग्णालये
उद्याने आणि प्राणिसंग्रहालये
कोळीवाड्यांच्या विकासासाठी