

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत मेघवाडी, लालबाग, परळ परिसरातील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील ४ बांधकामांचे निष्कासन मंगळवारी करण्यात आले. हा भूखंड मोकळा करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यामुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल.
अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
विकास नियोजन आराखडा-२०३४ नुसार, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील मनोरंजन मैदान आणि महानगरपालिका शाळा या सार्वजनिक उद्देशाने राखीव करण्यात आले आहेत. एकूण १३ बांधकामांपैकी ०७ बांधकामांचे निष्कासित करण्यात आले आहे. तथापि, उर्वरित ०६ बांधकामांच्या निष्कासनाची कारवाई लवकरच करण्यात येईल. यामुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल.