मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीत सहभागी वाहनांवर कडक लक्ष ठेवण्यासाठी प्रथमच भौगोलिक कुंपण (जिओ फेन्सिंग) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत सहभागी एकूण २ हजार ८६५ वाहनांच्या हालचालींवर बारिक लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे कोणतेही वाहन निवडणूक अधिकारी यांच्या कक्षाबाहेर गेल्यास त्याचा अलर्ट नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विविध सोयीसुविधा पुरवण्यापासून मनुष्यबळ नियोजन, सुरक्षा, मतमोजणीसाठी चोख व्यवस्था इत्यादी बाबींसाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे.
पालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष
सर्व वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहतूक शाखेकडून नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथे वाहनांचे थेट स्थान निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग), विशिष्ट कालावधीत मार्गक्रमणाचा इतिहास (पास्ट हिस्टरी) आणि भौगोलिक कुंपण इशारा (जिओ फेन्सिंग अलर्ट) या बाबींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनांवर ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आलेली असून ते नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहे. त्यामुळे कोणते वाहन कोणत्या मार्गाने प्रवास करत आहे किंवा कोणकोणत्या ठिकाणी गेले, या विषयी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ३ अभियंता आणि ३ प्रचालक (ऑपरेटर) यांची ८-८ तासांच्या प्रत्येक सत्रांनुसार यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
बेस्ट, एसटी, खासगी वाहनांवर राहणार लक्ष
मतदान यंत्रे, मतदान प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी एकूण २ हजार ८६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बेस्टच्या १ हजार २३ बसेस, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १०१ बसेस, खासगी १ हजार १६० बसेस आणि ५८१ टॅक्सींचा समावेश आहे.