

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्ष १५ जानेवारी रोजी होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेससोबत जाण्याऐवजी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युती करून लढण्यास उत्सुक आहे, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. या संदर्भात बुधवारी येथे पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली.
नेते, कार्यकर्त्यांचा कल उद्धव-राज यांच्याकडे
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या सूत्रांनी सांगितले की, बुधवारी झालेल्या बैठकीत पुढील महिन्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी आणि प्रचारासाठी हाती घ्यायचे मुद्दे यावर चर्चा झाली. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या बहुसंख्य कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती हवी आहे. पक्षातील बहुतांश नेत्यांचेही मत याच बाजूचे आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत राहिल्यास फायदा होऊ शकतो असे बऱ्याच नेत्यांचे म्हणणे आहे.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
दुसरीकडे, आम्ही मुंबईतील १२२ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून २१ तारखेला मविआच्या नेत्यांशी अंतिम चर्चेची फेरी पार पडणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने आम्हाला सोबत घ्यावे अशी आमची इच्छा आहे. पण जर नाही घेतलं तर जे बरोबर आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे शशिकांत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. मविआ म्हणून लढताना ज्या जागा आमच्याकडे आहेत, त्या जागा देण्याच्या संदर्भात चर्चा करुन मार्ग निघावा, जागांसाठी सन्मानजनक तोडगा निघावा, असे शशिकांत शिंदे म्हणाले. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, महिन्यापूर्वी काँग्रेसच्या मुंबई युनिटच्या प्रमुख वर्षा गायकवाड आणि इतर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षासोबत युती करण्यावर चर्चा केली होती, ज्याला त्यांनी काँग्रेसचा "नैसर्गिक मित्र" असे म्हटले होते. काँग्रेसने म्हटले होते की, त्यांना "समान विचारसरणीच्या पक्षांसोबत" मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे, परंतु मनसेसोबत हातमिळवणी करण्याच्या कल्पनेला त्यांनी पसंती दिली नाही. गायकवाड यांनी म्हटले होते की, जे लोक कायदा हातात घेतात किंवा धमकावण्याचे प्रकार करतात, त्यांच्याशी युती करता येणार नाही.