BMC निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; ६४ हजारांवर कर्मचारी रूजू; २२ हजार पोलीस तैनात; ४,५०० स्वयंसेवक नियुक्त

येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी ६४,३७५ कर्मचारी-अधिकारी, ४,५०० स्वयंसेवकांची तसेच २२ हजार पोलीस नियुक्ती करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
BMC निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; ६४ हजारांवर कर्मचारी रूजू; २२ हजार पोलीस तैनात; ४,५०० स्वयंसेवक नियुक्त
Published on

मुंबई : येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी ६४,३७५ कर्मचारी-अधिकारी, ४,५०० स्वयंसेवकांची तसेच २२ हजार पोलीस नियुक्ती करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात १७०० उमेदवार आहेत. निवडणुकीची संपूर्ण तयारी पालिकेकडून पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर लागणारी यंत्रणा, सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ८० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सध्या ६४ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी सुमारे ४५०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक मतदानाच्या दिवशी मतदार रांगा लावणे, गर्दी व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे आदी जबाबदारी असणार आहे. तसेच प्रत्येक प्रभागात महिलांकडून व्यवस्थापित केलेले किमान एक गुलाबी सखी मतदान केंद्र उपलब्ध असेल. अशा केंद्रांमध्ये पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सर्व निवडणूक कर्मचारी महिला असतील. मतदान केंद्रावर मतदाराने शक्यतो, मोबाईल न्यायचा नाही, मात्र नेलाच तर तो स्वीच ऑफ करावा. सुरक्षिततेच्या दृष्टीने २२ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त व पारदर्शकरीतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडाळा, शीव विभागात पोलिसांनी पथसंचलन केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडाळा, शीव विभागात पोलिसांनी पथसंचलन केले.छायाचित्र : विजय गोहिल

केंद्रांवर सुविधा

पिण्याचे पाणी, मतदारांसाठी प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा रॅम्प व व्हिलचेअर, मानक मतदान कक्ष, आवश्यक दिशादर्शक फलक आदी. दिव्य़ांग मतदार, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेश देताना प्राधान्य देण्यात येणार आहे.

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिका

  • मुंबई विभाग : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी - निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल

  • खान्देश विभाग : नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे

  • पश्चिम महाराष्ट्र विभाग : पुणे, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली -मिरज-कुपवाड

  • मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर

  • विदर्भ विभाग : अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर

पालिकेकडून मतदान केंद्रांवर कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.
पालिकेकडून मतदान केंद्रांवर कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. छायाचित्र : विजय गोहिल

मतदानाकरिता कर्मचाऱ्यांना उद्या भरपगारी सुट्टी

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रभादेवी येथील कामगार मैदानात 
१०० टॅक्सी तैनात करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी प्रभादेवी येथील कामगार मैदानात १०० टॅक्सी तैनात करण्यात आल्या आहेत. छायाचित्र : विजय गोहिल

आचारसंहिता कक्ष आणि पथके

प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार विभागीय सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथक कार्यरत आहेत. यात स्थिर पाळत पथक निश्चित ठिकाणी तैनात करण्यात येते, ज्या मार्फत रोख रक्कम व दारूचे बेकायदेशीर वाहतूक, शस्त्रसाठ्याची वाहतूक यांवर नजर ठेवली जाते. तसेच भरारी पथक प्रभागात फिरून हे काम करेल.

मतदान केंद्रावर मोबाईल नेऊ नका!

मतदान केंद्रावर मोबाईल आत घेऊन जाताना स्विच ऑफ करावा. मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये, असे आवाहन पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे. मुंबईकर समजूतदारपणे वागतील, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

  • कंट्रोल युनिट - २० हजार

  • बॅलेट युनिट -२५ हजार

  • केंद्र ठिकाणे -२,२७८

  • मतदान केंद्रे - १०,२३१

  • उमेदवार - १,७००

  • पुरुष - ८२२

  • महिला - ८७८

मतदार संख्या

एकूण मतदार - १,०३,४४,३१५

पुरुष - ५५,१६,७०७

महिला - ४८,२६,५०९

इतर - १,०९९

logo
marathi.freepressjournal.in